Showing posts with label जलदुर्ग. Show all posts
Showing posts with label जलदुर्ग. Show all posts
Wednesday, September 26, 2018
Thursday, June 22, 2017
सागरी गडकोट सिंधुदुर्ग
सागरी गडकोट सिंधुदुर्ग
२२.०६.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख
इथे क्लिक करावे ===>> सागरी गडकोट सिंधुदुर्ग
मालवण तालुक्यामधील सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे सागरी किल्ल्यांमधील एक सर्वांगसुंदर किल्ला म्हणावा लागेल.मराठा साम्राज्याचे शासक किती दूरदृष्टीचे, राज्यनिपुण, महत्त्वाकांक्षी आणि संपन्न होते हे जर आपणाला पहायचे असेल तर महाराष्ट्राच्या कोंकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या महाराष्ट्राच्या सागरीगडकोट किल्ल्यांच्या शृंखलेतील एक अद्वितीय किल्ला सातासमुद्रावरून येणाऱ्या गोऱ्या युरोपीयन आक्रमकांच्या उरात धडकी भरवणारा किल्ला म्हणून ओळखला जातो. छत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत आज हा जलदुर्ग डौलाने उभा आहे.अप्रतिम दुर्गबांधणी व अष्टावधानाचे प्रतिक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला २२ एप्रिल २०१६ रोजी तब्बल ३५0 वर्षे पूर्ण झाली.शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मालवणमधला सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वराज्य रक्षणार्थ सागरी नाकेबंदीची नितांत आवश्यकता आहे, ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने हेरली आणि मालवणपासून समुद्रात २ किलोमीटरवर असलेल्या एका खडकाळ बेटावर अरबी समुद्रात सागराच्या लाटा झेलणारा सिंधुदुर्गचा किल्ला उभा केला. याच्या आजूबाजूला समुद्रात इतस्ततः विखुरलेल्या खडकांमुळे या किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. मराठी आरमारासाठी समुद्रातील एक सुरक्षित नाविक तळ म्हणून पण याचा खूप उपयोग झाला.
भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे,हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले.
मालवणच्या सागरी किनाऱ्यावर दगड-खडकांनी वेढलेल्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग आहे.येथे जाण्य़ास मालवणहून बोटीने प्रवास करावा लागतो.पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर मालवण जेटी वरून सिंधुदुर्गकिल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात.किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते.
या किल्ल्यास ३२ बुरूज आहेत. तटाची रूंदी सरासरी १० फूट आहे. तटबंदी नागमोडी वळणाची असून, शत्रूवर तोफा आणि बंदुका यांचा परिणामकारक मारा करण्यासाठी तटाची रचना कौशल्यपूर्ण केली.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते.प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. सिंधुदुर्गकिल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे.
तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर लागते. ह्या किल्ल्यावर शिवकालिन गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागतेहे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.
तटाच्या आत आले की मुख्य रस्ता राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही.
वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. ह्या बुरुजाचा उपयोग टेहाळणी करीता केला जात असे.बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे.
बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास ‘‘राणीची वेळा‘‘ (चौपाटी) म्हणतात. ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत.
किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत.
जेव्हा किल्ला पूर्ण बांधून झाला, तेव्हा तो पाहण्यासाठी शिवाजी महाराज स्वत: किल्ल्यावर आले. तो भव्य-दिव्य किल्ला पाहिल्यावर त्यांनी सर्व सैनिकांचे व कारागिरांचे अभिनंदन केले व कौतुकाने पाठ थोपटली. जेव्हा त्यांनी विचारले, ''या कामाबद्दल काय तुम्हाला काय बक्षीस देऊ?'' तेव्हा सर्वांनी या गोष्टीस नकार देऊन आपली आठवण म्हणून आपल्या हातापायाचे ठसे देण्याची विनंती महाराजांना केली. ही विनंती मान्य करून त्यांनी चुन्याच्या मिश्रणाच्या साहाय्याने आपल्या हाता-पायाचे ठसे दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत.जलदुर्ग पाहून झाल्यावर मालवणच्या मेव्याचे आस्वाद घेत पुन्हा बोटीने मालवणच्या किनारी यावे लागते.
सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येतात. किल्ला दर्शनासाठी लाखो इतिहासप्रेमी, पर्यटक किल्ल्यावर जातात, पण शासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी योग्य माहिती व इतिहास सांगणारा उपक्रम राबविण्यात आला नसल्यामुळे छत्रपतींच्या शौर्याची गाथा ऐकायला मिळत नाही.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा देदीप्यमान इतिहास येणाऱ्या पिढीला कळावा म्हणून महाराष्ट्रातील गड कोट किल्ल्यांचे जतन व्हायला हवे सिंधुदुर्ग किल्ला एक प्रतीक आहे. पण शासनाचे दुर्लक्ष आणि पुरातत्त्व विभागाची उदासीनता यामुळे साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्त्व आणि दरवर्षी ढासळत चाललेली तटबंदी पाहता या समृद्ध शिवलंकेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावा.
Thursday, May 25, 2017
कासा उर्फ पद्मदुर्ग
२५.०५.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख
इथे क्लिक करावे ===>> कासा उर्फ पद्मदुर्ग
जंजिरा जलदुर्गाच्या शेजारीच ’कासा उर्फ पद्मदुर्ग’ हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे.मुरुड हे गाव तालुक्याचे असून ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुरुड हे जंजिरा या जलदुर्गामुळे प्रसिध्दच आहे.किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.
मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे.या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनार्यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेवून जावू शकते आपण संख्येने जास्त असल्यास फारसा आर्थिक भार पडत नाही.सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार कासाकडे येण्यासाठी तयार होतात. आपण आगाऊ चौकशी करुन किंवा आदल्या दिवशी जर नौका ठरवली तर वेळेची बचत होऊन गैरसोय टळू शकते.येथे जाण्यासाठी ’कस्टम’ ची परवानगी घ्यावी लागते. मुरुड जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्मदुर्ग पहाण्यासाठी जात नाहीत, कारण जंजी-याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पद्मदुर्ग ला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत.
मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे गाठावे रोह-चणेरे बिरवाडी मार्गे मुरुडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरुड गाठता येते.
पद्मदुर्ग (कासा किल्ला ) ला भेट देण्यासाठी मुरूड कोळीवाडयातील एकदरा गावातून खाजगी बोटीने जावे लागते.एकद-यापासून किंवा राजापूरीपासून नावेने अर्धा तासाच्या आत कासा किल्ल्याला पोहोचतो.येथे जेटी नसल्याने पाण्यातच उतरावे लागते.समुद्राला ओहोटी असल्यास दुर्गावर जाण्यास योग्य वेळ समजली जाते.बोट खडकाला लावतात.तेथे शेवाळ असल्याने सावधानता बाळगावी. दुर्गात प्रवेश करताच याची भव्यता कळून येते. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे.पद्मदूर्गच्या पडकोटचा वैशिष्ट्येपूर्ण कमळाच्या आकाराचा भव्य बुरुज दूरुनच आपले लक्ष वेधून घेतो. मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे. या बुरुजाच्या चर्चा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे फुललेल्या आकाराच्या आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.चोहोबाजुंनी समुद्राने वेढलेल्या या पद्मदुर्गला जाताना बोटीत निवांतपणे बसून प्रवास करणे हे आपले भाग्यच मानले पाहिजे.
कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आहे. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खार्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून आपण मुख्य किल्ल्याकडे निघायचे पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला आहे.
दुर्गाचे मुख्यद्वार पूर्वेकडे तोंड करून आहे. कासा किल्ल्याच्या महाव्दाराने प्रवेश करण्यासाठी चार पाच पायर्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्याच्यासाठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दोन बुरुज आहेत.या ३० फूट उंच बुरुजात तोफा ठेवण्यासाठी झरोके व जागोजागी जंग्या आहेत. तसेच बाजूच्या तटबंदीत असलेल्या जंग्याचा व तोफांचा रोख प्रवेशद्वारावर आहे.प्रवेशद्वाराच्या बाजूच्या दगडांच्या भिंतीतील दगड लाटांच्या, वार्याच्या मार्याने झिजलेले आहेत.किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात.
काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चार टाकी केलेली दिसतात.किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत नावेने फिरायचे.तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचा किनाराही उत्तम दिसतो.आम्ही किनार्याकडे निघालो ते एका अविस्मरणीय गडभेटीची आठवण घेउनच.
इतिहास :-
जंजी-याच्या सिद्धीचा कोकण पट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.
हि बातमी कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती. परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती. किल्याची रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६५७ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्र दिवस एक करून सिद्धीशी लढत लढत किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली. इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजी-याची मोहीम काढली या मोहिमेत मचव्यावरून तोफांचा मारा जंजी-या वर केला पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंत यांनी जंजी-याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्म्दुर्गावर काम करणा-या अष्टगारातील सोनकोळ्याच्या प्रमुखाने लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्वीकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८-१० सहका-यांसह पद्मदुर्ग मधून बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेत जंजी-याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारक-याची वाट पाहीत राहिला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही हा पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्मदुर्ग गाठला.
लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराज काय ते समजले. त्यांनी मोरोपंताना एक नावे गलबत बांधून त्याचे नाव "पालखी" ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण, व दर्या किनारीची "सरपाटीलकी" दिली.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही १६८० मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात मिळतो. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठयांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला.
ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेला हा किल्ला अजूनही तसा अपरिचित.
Thursday, May 11, 2017
देखणा जलदुर्ग जंजिरा
११.०५.२०१७ रोजी ’प्रहार’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख
इथे क्लिक करावे ===>> देखणा जलदुर्ग जंजिरा
खूप दिवस वाट पाहिल्यानंतर ’जंजिरा’ या जलदुर्गावर जाण्याचे संधी मिळाली.’जंजिरा’ हा इतिहासप्रसिद्ध जलदुर्ग आहे. ह्या जलदुर्गाचे बांधकाम पाहून चकित झालो. या गडाचे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात रक्षण कारणे सोपे नाही.किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज. लाटांच्या तडाख्याने या तटबंदी च्या पायथ्याला जरी खिंडारे पडली तरी अजून आत कणखर कातळ तसाच आहे.म्हणुनच महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
३५० वर्ष अजिंक्य किल्ला यासाठी कुतूहल आणि सिद्दीने केलेले अत्याचार, मराठ्याना न जिंकता आल्याचा राग.मराठयानी महाराष्ट्रावर, भारतावर सत्ता गाजवली. जमीन आणि सागरावर नियंत्रण मिळवले, पण जंजिराने कायमच मराठ्याना हुलकावणी दिली. मराठी दौलतीच्या इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख अनेकवार केलेला दिसतो.
महाराष्ट्रात रायगड हा जिल्हा गड कोटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जितका हा जिल्हा निसर्गाने व वनराईने समृद्ध व डोंगर दऱ्यांनी भरलेला आहे. तितक्याच प्रचंड व व विस्तीर्ण प्रकारचा समुद्र किनारा ही या जिल्ह्याला लाभला आहे.
महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे या किनारपट्टीचे पूर्वी अनेक जलदुर्ग बांधले गेले. या समुद्र किनाऱ्यावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळी वेगळी आनंदयात्राच ठरते.जंजि-याच्या तटबंदीवरुन विस्तृत पसरलेला अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीचा मनोरम्य प्रदेश दिसतो. समुद्रात बांधलेला कांसा उर्फ पद्मदुर्ग पाहू शकतो.
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन आलेला आहे. जझीराचा अर्थ बेट असा होतो.रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा असलेल्या राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटा वर बांधलेला आहे.कोकण किनाऱ्याला लागूनच अलिबागच्या दक्षिणेकडे, अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव असून ते इतिहास प्रसिद्ध आहे. या गावाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा आसमंत हिरवागार आहे. मुरूडच्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा `नबावाचा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते.
जंजिरा जलदुर्ग पाहायचा असेल तर पुणे मुंबई मार्गेअलिबाग गाठायचे.पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते.कोकणातून यावयाचे झाल्यास महाड - गोरेगाव - म्हसळे - बोर्लिपचंतन दिघी गाठावे. दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.
मुरूड पासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर भर समुद्रातील बेटावर जंजिरा किल्ला उभा आहे. मुळातच मुरूडचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. किनाऱ्यावरून दिसणारा हा भव्य किल्ला तर सौंदर्यात आणखीनच भर टाकतो.राजापुरी गावाच्या किना-याहून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे गडावर राहण्या-खाण्याची व्यवस्था नाही.शिडाच्या होड्यांतून केलेला प्रवास आनंददायी असतो.इथे शिडाच्या होड्यातून जंजि-यावर जाण्याची वेगळीच मजा आहे.इतिहासात असलेल्याचा भास होतो.आपण दंडा राजपुरीच्या किनाऱ्यावरून बोट पकडून सागराच्या लाटांवर स्वार होत थोडक्या वेळात जंजिरा किल्ल्याच्या समीप पोहचतो. जंजिरा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बाजूच्या दोन प्रचंड बांधणीच्या बुरूजांमध्ये लपविल्यामुळे त्यांच्या समोर गेल्याशिवाय आपणास ते दिसत नाही. समुद्राच्या लाटांमुळे हेलकावणाऱ्या नावेतून पटकन उडी मारून आपण जंजिरा किल्ल्याच्या पायऱ्यांवर उतरायचे.
प्रवेशद्वारावरील पांढऱ्या दगडातील पारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्हीबाजूच्या भिंतीवर विशिष्ट प्रकारचे दगडात कोरलेले शिल्प आढळते. हे गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते. दोन दरवाजांच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. जंजिरा किल्ल्याच्या महाव्दारावर नगारखाना आहे.जंजि-याची तटबंदी बुलंद आहे. एकोणीस बुलंद असे बुरुज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पाय-या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करुन तोफा ठेवलेल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव ‘कलाडबांगडी’ असे आहे.जंजिर्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.किल्ल्यावर दोन मोठाले गोड्या पाण्याचे तलाव आहेत.
किल्ल्यातील अंतर्भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूला आणखी एक द्वार आहे. उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे. यालाच पीरपंचायतन असे म्हणतात. त्यांच्या शेजारीच सिद्धी घराण्यातील मंडळींच्या कबरी आहे. या पंचायतनाच्या पटांगणातच काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात.येथून बाहेर पडल्यावर समोरच तीन मजली पडकी भक्कम बांधणीची इमारत दिसते यालाच ’सुरुलखानाचा वाडा’ असे म्हणतात. अनेक वर्षात या वाड्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्कोनी गोड्यापाण्याचा तलाव आहे. गडावर दोन तलाव आहेत.विशेष म्हणजे सागरी किल्ला असून देखील किल्यातील तलाव हे गोड पाण्याचे आहेत.बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगच्ची इमारत हीच ’सदर’ आहे.तलावाच्या बाजूने बांधीव पाय-यांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे.गडाच्या पश्चिमेला किंचित तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. पीर पंचायतन, सुरूलखानाचा वाडा, किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि या तटबंदीवर उभारण्यात आलेले अनेक भक्कम बुरूज आजही काळाशी टक्कर देत आहेत. किल्ल्यातील या बुरूजावरून बसविलेल्या काही तोफा आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.किल्ल्यामध्यील लोकांसाठी तीन मोहल्ले वसविले होते ज्यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांसाठी होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती जी राजाश्रय संपल्यानंतर तेथून उठून गेली.गडाची ही माहीती तेथील गाईड देतात.पण हा गड पाहण्यास खुपच वेळ देतात.दिलेल्या वेळेत पळत पळत हा दुर्ग पाहावा लागल्याने गडप्रेमी नाराज होतात. ज्यावेळेस राजपुरीला आपल्याला बोट नेऊन सोडते त्यावेळेस शिवरायांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न ‘त्याची देही, याचि डोळा’ पाहिल्याचे समाधान प्रत्येक दुर्ग प्रेमीच्या चेहऱ्यावर विलसत असते.
शिवाजीमहाराजांनी कोकणपट्टीवरील अनेक दुर्ग ताब्यात आणून आणि स्वराज्याच आरमार तयार करून सिद्याच्या कोकणातील अत्याचारांना मोठाच आळा घातला होता;पण जंजिरा आपल्या ताब्यात आणण्यास मात्र त्यांना यश आल नाही.
कोकण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्व जलदुर्गात हा किल्ला अतिशय भक्कम आणि अभेद्य असल्याने तो सदैव अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच त्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला सर करण्याचे अनेकदा प्रयत्न केले, पण ते असफल झाले. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजिक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही.
जलदुर्गाची इतिहास
जंजिरा किल्ल्यालाच "किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा' अशी नावे होती. इ.स १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट 'किल्ले मेहरुब' नावाने ओळखला जाऊ लागला.
इ.स १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तरकोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते.सन १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण,हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार ,मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिध्दीची कोंडी केली पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिस-या स्वारीचे वेळी शिवाजी महाराजानी व्यंकोजी दत्तो यास फौजेनिशी रवाना केले. त्यानी प्रयत्नाची शिंकस्त फार केली. पण,हा प्रयत्न देखील फसला. १६७८ च्या जुलै मध्ये शिवरायांनी जंजि-यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन १६८२ मध्ये संभाजीराजांनी दादाजी रघुनाथाला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिध्दी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.
पश्चिम किनारपट्टीवर बलदंड जलदुर्ग म्हणून ओळखला जाणारा मुरूडचा जंजिरा जलदुर्ग अपराजित दुर्ग म्हणून इतिहासात ओळखला जातो. इतिहास काल्पनिक गोष्ट नसल्याने ही गोष्ट मान्य करणे भाग पडते. एवढा बलाढ्य जलदुर्ग जंजिरा पाहण्यासाठी देश-विदेशातूनही पर्यटक प्रचंड संख्येने येत आहेत. याचे रहस्य यात दडलेले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जंजिरा किल्ल्याची व्यवस्था आणि निगा राखण्याची जबाबदारी केंद्रीय पुरातन खात्याकडेच आहे.
एकदा तरी हा देखणा जलदुर्ग जंजिरा पाहावा.
Friday, May 29, 2015
सिंधुदुर्ग किल्ला
हल्लीच कोकण दौरा केला त्या दौ-यात सिंधुदुर्ग या जलदुर्गात जाण्याची संधी मिळाली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतकेउभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.
किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे किल्ला अगदी उठून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य व अजिंक्य जलदुर्ग बांधला तोच सिंधुदुर्ग होय.
चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे,हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे.येथे जाण्य़ास मालवणहून बोटीने प्रवास करावा लागतो.पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर मालवण जेटी वरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात . किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे.
तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या हाताला जरीमरीचे मंदिर लागते. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.
तटाच्या आत आले की मुख्य रस्त्यावर राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही.
वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. ह्या बुरुजाचा उपयोग टेहाळणी करीता केला जात असे.बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे.
बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात. ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत.
गाईडने किल्ल्याची माहिती चांगल्या प्रकारे दिली.इतिहास डोळ्यासमोर उभा केला.
गाईडने किल्ल्याची माहिती चांगल्या प्रकारे दिली.इतिहास डोळ्यासमोर उभा केला.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या डागडुजीचे काम सुरु होते.
भवानी मंदिर
सिंधुदुर्गाच्या इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.''फोर्ट ऑगस्टस'' कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
हा भव्य जलदुर्ग पाहून आनंद झाला.
हा भव्य जलदुर्ग पाहून आनंद झाला.
Thursday, April 18, 2013
जलदुर्ग कुलाबा
जलदुर्ग कुलाबा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात मुंबई शहरापासून ३५ किलोमीटर दक्षिणेस अलिबागजवळ आहे.
अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे.
भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. किल्ल्याच्या नावावरून जिल्ह्याला कुलाबा हे नाव पडले.तेथून भरती असेल तर लाँच सर्व्हिस वापरायची,ओहटीला घोडागाडी किंवा चालत जलदुर्गाला लागायचे.
मुबंईहून मुंबईच्या प्रवेशव्दारच्या बाजुला असलेल्या बोट सेवेच्या बोटीतून प्रवास करीत मांडवा येथे उतरायचे.प्रवास सुखद वाटतो.मांडवा येथे उतरल्यावर तेथून बसने अलिबग गाठायचे.मुबंई ते अलिबाग असे बोटीचे व बसचे भाडे एकत्र आकारले जाते.अलिबाग येथे चहापान करुन बीचला पोहचायचे.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे.

अलिबागपासून तीन किमी. वर एका खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. निजामशाहीच्या काळात सद्दी लोकांनी कुलाबा व रत्नागिरी या जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यावर आपली सत्ता स्थापन केली आणि तेथे काही जलदुर्ग व भुईकोट किल्ले बांधले.
अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. ‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याला १७ बुरुज आहेत.
पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात.
किल्ल्यावर सिध्दीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो.
मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे.
दुर्गावरचे झेंडावदनाचे ठिकाण
मुख्य प्रवेशद्वार
किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत.
Subscribe to:
Comments (Atom)

































