Showing posts with label विशेष माहीती. Show all posts
Showing posts with label विशेष माहीती. Show all posts

Monday, June 19, 2023

कंठ दाटून येतो

 

२३.०५.२०२३ रोजी हा लेख महाराष्ट्र टाइम्स  या वॄतपत्रास ’पत्रास कारण की’ या सदरात  प्रसिध्द झाला आहे 



विजय मित्रा


परवाच्या राजगडच्या ट्रेकमध्ये तुझी ब-याच वेळा आठवण आल्याने आपल्या सर्व मित्रांच्यावतीने तुला पत्र लिहावेसे वाटले. करोनाच्या काळात तु अचानक आम्हाला सोडून गेलास पण सह्याद्रीतल्या प्रत्येक ट्रेकमध्ये तुझी आठवण येते. आपण एकत्र कामाला होतो पण तुझी आणि माझी ओळख मात्र एका ट्रेकमध्येच झाली. ओळखीपासूनच आपली मैत्री झाली. काय दिवस होते ते. पावसाळ्यात जवळजवळ प्रत्येक शनिवार आणि रविवार आपण सह्याद्रीत असायचो. तु ट्रेकमध्ये सर्वांची काळजी घेत होतास. तु ट्रेकला असल्यावर खाण्याची चंगळ असायची. सुका खाऊ,फळं व जेवण मांसाहारी आणत होतास. सगळे मित्र तुझी चेष्टा करायचे पण तु कधीच चिडला नाहीस. तुला फोटोची आवड असल्याने आमच्याकडून तु तुझे फोटो काढून घेत होतास. ट्रेकला जाण्यापूर्वी त्या गडाची संपूर्ण माहिती शोधून आणल्याने आपण कधी रस्ता चुकलो नाही. गडावर गेल्यावर तेथील ठिकाणाची माहिती तु सर्वांना देत होतास. ट्रेकमध्ये तु महाराष्ट्र गीत व भजन गात होतास. तुझे छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम होते. त्यामुळे तुला सह्याद्रीत भटकंती करण्यास आवडत असे. तु तुझ्या मुलांना देखील ट्रेकींगची आवड निर्माण व्हावी म्हणून ट्रेकला घेऊन येत होतास. ट्रेकमध्ये तु कधी आला नाही की चुकल्यासारखे वाटायचे. तुला तुझ्या गावाची ओढ होती. सणासुधीला तु कायम गावाला जात होतास. तुझ्या बैलाच्या जोडीचे,शेतात काम करतानाचे व नदीत पोहतानाचे फोटो शेअर करीत होतास. तुला समाजकार्याचीही  मोठी आवड होती. शाळा सुरु झाल्या की सुट्टी टाकून शाळेतील मुलांना पुस्तके, वह्या व शाळेत जाण्यास लागणारे साहित्य मुंबईहून टेपोने नेऊन कोकणातील शंभरएक शाळेतून मोफत वाटत होतास.   


करोना काळात तु आम्हाला सोडून गेलास पण आम्हाला तुझे अंतिम दर्शन घेता आले नाही. याचे दु:ख झाले. त्यावेळी तुझ्यासोबत केलेल्या ट्रेकमधील फोटो पाहत राहिलो. खूप वाईट वाटले. करोना संपल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी तुझ्या दोन्ही मुलांसह तुला श्रध्दांजली वाहण्यास एक गडावर गेलो होतो. त्यावेळी तुझी सर्वांनी आठवण काढली. तुझ्यासोबत केलेले सर्व ट्रेक डोळ्यासमोर येत होते. तु गायलेली गाणी अजून कानावर येत असतात. तुझ्या कुटुंबाची आम्ही नियमित चौकशी करून माहिती घेत असतो. 


तु आम्हाला मध्येच सोडून गेलास पण तुझ्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत.  ट्रेकमध्ये तु आमच्या सोबत आहेस असा भास होत राहतो. ट्रेकमध्ये इतरांना आपण कोठे आहोत याची माहीती देण्यासाठी एक विशिष्ठ आवाज काढत होतास. त्या आवाजाला व तुला आम्ही कधीच विसणार नाही.


तुझा मित्र

विवेक तवटे


Sunday, May 31, 2015

मार्गदर्शक गुगल मॅप



  काही दिवसापूर्वी मित्रमंडळीस ’सांधण व्हॅली’  येथे जाण्यास रात्री बारा सुमारास खाजगी वाहनाने ठाण्याहून निधाले.गप्पा करीत करीत इगतरपूरी पर्यत प्रवास हायवेने सुरु केला.रात्र असल्याने रस्ता दाखवण्यास कोणीच नव्हते.मग मोबाईलवरील गुगल मॅपवर ’साम्रद’ ह्या ’सांधण व्हॅली’ जवळील गावाची  नाव नोंद केली.’नेट’ व ’जीपीआरएस’ सुरु केले.मोबईलवरील या अ‍ॅपने मार्ग दाखवण्यास सुरुवात केली.नाशिक हायवे सोडून ’भंडारदरा’च्या मार्गाकडे वळण्याची पहिली सुचना मिळाली.पुढे प्रत्येक वळणावर पूर्वसुचना मिळत होती.गाडीच्या वेगात ’साम्रद’ या गावी किती वाजता पोहचणार व अजून किती अंतर कापायचे आहे याची माहीती मिळत होती.

 किर्र रात्र होती.रस्त्याला चिटपाखरु दिसत नव्हते.चालकाला रस्त्याची माहीती नसल्याने त्याला मोबाईल पाहून रस्त्याची माहीती देत होता.रस्त्याच्या बाजुला असलेल्या काही ठिकाणांची माहीती दाखवण्यात येते.यावरून आपण आपला मार्ग योग्य दिशेने जात असल्याची खात्री करु शकतो.चालकालाही रस्त्यावरच्या छोट्याछोट्या नोंदी पाहून आश्चर्य वाटले.पुढे येणा-या गावाची नोंद व अंतर याचीही माहीती दिली जाते.यावरून आपला प्रवास योग्य दिशेन सुरु आहे याची खात्री पटते.रस्ता दोन भागात विभागत असेल तर  आपण कोणत्या मार्गाने जायाचे याची पूर्व सुचना शंभर मीटर अगोदर दिली जाते.  

  या अ‍ॅपच्या साहाय्याने आम्ही सगळे चार वाजता ’साम्रद’ गावी सुखरुप पोहचलो.पोहचल्यावर आपण सांगितलेल्या ठिकाणी पोहचला आहात असे सांगितले गेले.मोबाईलवरील या अ‍ॅपची मदत झाली नसती तर रस्त्याच कोठेतरी थांबून पहाटे प्रवास करावा लागला असता.रात्री रस्ता शोधणे कठीण झाले असते.गावातल्या मंडळी इतक्या रात्री कसे काय पोहचलात याची पिचारपूस केली.

 गुगल मॅप या अ‍ॅपने निर्धास्त प्रवास करु शकतो याची प्रचिती आली.खूप जणांनी हे  अ‍ॅपच्या मदतीने प्रवासही केला असेल.पण ज्या मंडळीना यांची माहीती नसले त्यांच्यासाठी ही माहीती पुरवली आहे.

  आपल्या ट्रेकर मंडळीना एक विंनती आहे या ’गुगल मॅप’वर गडाच्या ठिकाणांच्या नावाची नोंद केल्यास तेथे जाण्यास सर्व ट्रेकरना मदत होईल. 

Saturday, May 11, 2013

गिरिदुर्गाच्या विश्वात!

डोंगर भटक्यांच्या दुनियेत आनंद पाळंदे हे नाव एखाद्या गिरिदुर्गाप्रमाणे घेतले जाते. गेली अनेक वर्षे ते या डोंगरदऱ्यांचे आव्हान घेत सह्य़ाद्री फिरत आहेत. डोंगर यात्रांच्या त्यांच्या या अनुभवातूनच कधी १९८६ साली एका दुर्गसाहित्याने आकार घेतला होता. भटक्यांच्या पसंतीस आलेले हे साहित्य पुढे मात्र मिळेनासे झाले होते. अशाच या दुर्मिळ बनलेल्या दुर्गसाहित्याचा नवा चेहरा नुकताच प्रसिद्ध झाला आणि सह्य़ाद्रीच्या या वाटांना जणू पुन्हा नवे धुमारे फुटले. डोंगर दऱ्यांच्या प्रेमात, त्यांच्या विश्वात आपले पाय आणि डोळे अडकविणाऱ्या या पुस्तकाचे नाव काहीसे असेच 'गिरिदुर्गाच्या पहाऱ्यातून'!
















दीडशे पानांच्या या पुस्तकात सह्य़ाद्री आणि तिच्या लगतच्या पंचवीस आडवाटा आपल्या पुढय़ात उलगडत जातात. लोहगड विसापूरचे भ्रमण, अलिबागचा परिसर, कर्नाळ्याचा पक्षी डोंगर, कऱ्हेपठारीचा मल्हारगड, माणदेशीचे संतोष-वारुगड, चंदन-वंदनची दुर्गजोडी, कात्रज ते सिंहगड ट्रेक, भीमा ते इंद्रायणी दरम्यानचे गिरिभ्रमण, जावळीतील आडवाटा, सिद्धगडचा भवताल, कांगोरी-चंद्रगडाची वाट, कुकडीचे खोरे, हरिश्चंद्रगडाचा परिसर, भंडारदऱ्याचा भवताल, सातमाळ रांगेतील गडकोट, सिंहगड ते रायगड पदभ्रमण, मावळातील दऱ्या-खोऱ्या, अजिंठाची डोंगररांग, असा सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यालगचा मोठा भाग उलगडत जातो.
या प्रत्येक प्रकरणातून त्या त्या प्रदेशातील भूगोल-इतिहास तर आहेच, पण या आडवाटांवरील सौंदर्यस्थळेही पाळंदे यांनी सांगितली आहेत. दुर्ग, लेण्या, मंदिरे, जंगले, देवराया, नद्या, नाले अशी या भटकंतीची अनेक रूपे यातून पुढय़ात येतात. या माहितीला जागोजागी उपयुक्त नकाशे, स्थलदर्शक छायाचित्रांचीही जोड दिलेली आहे. भटकण्याची हौस असणाऱ्यांनी केवळ पायपीट करून भागत नाही. या श्रमाला अशी वाचनाची, बुद्धीची, शोधाची, ध्यासाची जोड दिली तर प्रत्येक डोंगर यात्रा आनंदी होते.
(गिरिदुर्गाच्या पहाऱ्यातून, उत्कर्ष प्रकाशन, संपर्क - ०२०-२५५३७९५८).

Wednesday, February 20, 2013

गिरिभ्रमणातील सावधपण

गतवर्षी कर्नाळ्याच्या पायथ्याशी दुर्ग साहित्य संमेलन चालू असताना दुर्गप्रेमींच्या मंडपात संदेश आला, की कर्नाळ्यावर अपघात झालाय. मदतहवी आहे. 'गिरिप्रेमी' संस्थेचे टेकराज अधिकारी, आशिष माने तातडीने गडावर सुळक्यापाशी गेले. सुळक्यावरून पडलेल्या तरुणाला पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेमध्ये ठेवून पनवेलला पाठविले.
तोरण्याच्या पायथ्यास मोटार लावून दोन मित्र गड चढू लागले. ते गडावर पोहोचलेच नाहीत, परत आणले गेले त्यांचे ते मृतदेह. मात्र यासाठी तीन दिवस शोधमोहीम राबवावी लागली. ग्रामस्थ, पोलीस, श्रीपाद सपकाळांच्या नैतृत्त्वाखालची गिर्यारोहक तुकडी असे सर्वजण यासाठी काम करत होते. डोंगरातील टाकी, तळी, धबधबे हेही सापळेच बनलेत. का होतंय असं? हे टाळता येणार नाही? डोंगरात जाणे हा उपक्रम करण्यासाठी धडपडय़ा स्वभाव आवश्यक असतो. कधीतरी धडपडणे, मुका मार, खरचटणे हे होणारच किंबहुना ही गोष्ट गृहीतच आहे, पण डोंगरातील पायपीट, हाईक अथवा ट्रेक म्हणजे माऊटेनियरिंग किंवा गिर्यारोहण यासारखे धाडस आहे अशा थाटात मंडळी जेव्हा डोंगराकडे पावलं वळवतात तेव्हा गोची होऊ शकते.
गिरिभ्रमण हा गिर्यारोहण क्रीडेचा फक्त पाया आहे. ओळख आहे. निश्चित झालेल्या मार्गावरून पायी, स्वावलंबनाचा मंत्र जपत, गरजेपुरती सामग्री बाळगून डोंगराळ प्रदेशातून केलेली सहल म्हणजे डोंगरयात्रा अर्थात हाईक, ट्रेक! यात कष्ट पडणार म्हणजे दम आपसुकच लागणार, कधी वाट चुकणार, दिवाबत्ती नाहीच अशा स्थानी मुक्काम पडणार म्हणजे धाडसाची अनुभूती मिळणार पण हेही सहजपणे. त्यामुळे निसर्ग वैशिष्टय़ांचा उलगडा करून देणारा, शहरी गोंगाटापासून, आधुनिक राहणीमान नाकारून साध्या जीवनशैलीची चुणूक दाखविणारा निर्भेळ आनंद प्राप्त करून देणारा हा उपक्रमशील क्रीडाप्रकार आहे. वास्तविक पाहता यात अपघात व्हायचे कारणच नाही. अर्थात गांभीर्याने जाणीवपूर्वक काही अलिखित नियम पाळले तर!
यासाठी काय नियम असतात, असावेत! एकटय़ाने डोंगरात जाऊ नका. दोन-चार सहकारी असावेत. यातील एकजण तरी आधी त्या स्थळी गेलेला असावा. पूर्वानुभव नसल्यास स्थानिक गावकरी बरोबर घ्यावा. जाण्यापूर्वी नकाशा पाहा. पुस्तकांमधून माहिती शोधा, 'ट्रेकइट'चे कात्रण ठेवले असल्यास तेच पाहा. यावरून अंतर, वेळ, अवघडपणा याचा अंदाज येईल.
सोबत खाण्याचे पदार्थ, प्रथमोपचार साहित्य, पाण्याची बाटली हे आवश्यकच. नियोजन केल्यावर परतीची वेळ कसोशीने पाळा. काहीजण परत निघण्याच्या वेळेस म्हणजे दुपारी दोन नंतर डोंगरचढाई सुरू करतात. अनोळखी ठिकाणी ऊन्हे उतरली, अंधारून आल्यावर वाट कशी सापडणार? आरंभस्थानी ग्रामस्थांशी संवाद  साधणे अत्यंत महत्त्वाचे. अडचणीच्या वेळी हेच लोक अधिक उपयोगाचे ठरतात. त्यांचा मोबाईल क्रमांक टिपून ठेवणे उत्तम ठरते.
तुकडी मोठी असली तर उपतुकडय़ा कराव्यात म्हणजे शिस्त राहते. नियंत्रण सोपे होते. खाण्याच्या वेळी एकत्र मिसळले तरी वाटचाल गटागटानेच असावी. अर्थात गटबाजी नाही. कारण इथे स्पर्धाच नाही. आनंद घ्या आणि वाटा. वाट चालताना पहिला व शेवटचा मावळा ही आदर्श पद्धत आहे. पाणी पाहिलं की मोह होणे स्वाभाविक आहे. डुबकी मारण्यात मजा आहेच, पण एकाने काठावर राहून सतत लक्ष ठेवावे आणि पाण्यात उतरल्यावर काठाकाठाने पोहणे अधिक शहाणपणाचे नाही काय. श्रम करून घामेजल्या अवस्थेत थंड पाण्यात पायात वळ येऊ शकतात. अशा वेळी पट्टीचा पोहोणाराही काठावर कसा येणार? धबधब्याचे दृश्य समोरून जास्त छान असते. माथ्याजवळ जलौघातून तो दिसत नाही शिवाय पाण्याचा वेग धबधब्याच्या दिशेने वाढता असल्यामुळे निसरडय़ा दगडांवर खोली नसलेल्या पाण्यातही तोल जातो. त्यामुळे सुरक्षित अंतरावर पाण्यात उतरावयास हवे. मजा त्यातही आहे. धरणाचे तलाव फसवे असतात. खोली-अंतर समजत नाही. लांब पल्ल्याचा सराव असेल त्यानेच ही हिंमत करावी.
सह्य़ाद्रीतील बहुतेक गडांना निश्चित वाटा आहेत. गवताने झाकल्या तरी पाऊलखुणा असतातच. अपवाद वगळता अस्पर्शित कातळकडा चढावा लागत नाही. कडा चढण्यासाठी विशिष्ट कौशल्य लागते आणि सरावही असायला हवा. मी राजगडचा बालेकिल्ला चढलो आहे किंवा १० वर्षांपूर्वी कातळारोहण (रॉक कलांबिंग) शिक्षण घेतले आहे हे पुरेसे नाही. कुठे वाट नाही सापडली तर पुन: कधीतरी असे म्हणून परत फिरण्यात कमीपणा वाटू देऊ नये. नियमित ट्रेकिंग करणाऱ्या तुकडीसोबत १० मीटर लांबीचा 'क्लायबिंग रोप' असायला हवा. प्रशिक्षित नेतृत्वही हवे. अशावेळी अनगड वाटांचा आनंद घेण्यात हरकत नाही किंवा त्या तुकडीने अनेकवेळा एकत्र गिरिभ्रमणाला गेले असावे म्हणजे समंजसपणे माघार घेणे जमू शकते. प्रसंगी अन्नपाण्याविनाही घाबरून न जाता उघडय़ावर रात्र काढता येते.
एकूणात टक्केवारी पाहिली तर, अननुभवी भटके, तुकडी अपघातग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते. अशा लोकांनी एखाद्या संस्थेशी संलग्न व्हावे. ट्रेकमध्ये सामील होताना नेतृत्व कसे आहे याची माहिती घ्या. मुख्य म्हणजे त्यांच्या सूचना पाळा.
दुर्गसाहित्य संमेलन, गिरिमित्र संमेलनात जरूर सहभागी व्हा. त्यात मनाची मशागत चांगली होते. असे कार्यक्रम ठिकठिकाणी व्हावयास हवेत. यानंतर काय- पर्वतारोहणाचा आनंद, धाडस अनुभवा. 'माऊंटेनियरिंग' हा पुढचा टप्पा. यासाठी ध्यास हवा आणि अखंडित सरावाला पर्याय नाही.


 'लोकसत्ता' या वृतपत्रातील आनंद पाळंदे यांचा वाचनीय लेख. 
 

Thursday, December 27, 2012

खान्देशातील डोंगरयात्रा


भटकंतीचा सोबती

डोंगरदऱ्या भटकायला बाहेर पडले, की नाशिकची भूमी सर्वाधिक खुणावते. गाळणा, सेलबारी, डोलबारी, चणकापूर, दुंधेश्वर, त्र्यंबक, नाशिक, पेठ, सातमाळ, पट्टा अशा अनेक पर्वतरांगांचे पदर इथे एकामागे एक उलगडत जातात. पुन्हा या प्रत्येक रांगेवर गूढ आकार घेतलेले एकेक दुर्गशिखर दडलेले असते. नाशिकच्या या आसमंतात एकदा अडकले, की भटकणारे पाय या भूमीकडे सतत खेचत राहतात. अशाच भटक्यांसाठी, नाशिक प्रदेशातील या गिरिदुर्गवाटांची माहिती घेऊन नुकतेच एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे - Nashik Expanse - 101 trekking destinations!



नाशिकचे गिर्यारोहक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संजय अमृतकर यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे इंग्रजी भाषेतील खान्देशची डोंगरयात्रा आहे. नाशिकसाठीचा 'ट्रेकिंग इनसायक्लोपीडिया' असलेल्या या पुस्तकाच्या आकार, मांडणी, माहिती आणि छायाचित्रांपर्यंत साऱ्यांत वैविध्य आणि आकर्षकता आहे.
तब्बल सव्वादोनशे पानांच्या या पुस्तकात नाशिकमधील १०१ गिरिस्थळांची माहिती दिली आहे. या स्थळांची रचना करतानाही या भागातील एकेक डोंगररांगेप्रमाणे त्यांचे गट केलेले आहेत. पुन्हा या गटामध्येही मग एकेका स्थळाची प्रवासातील क्रमानुसार आखणी केलेली. या गटाच्या सुरुवातीलाच त्या डोंगररांगेची माहिती, विस्तार, नकाशा आणि एक पॅनरॅमिक छायाचित्र या साऱ्यांतून हा प्रदेशच आपल्यापुढे उभा राहतो. यानंतर आपण फक्त या रांगेवरील एखादे गिरिशिखर निवडायचे आणि चालू पडायचे. या अशा एखाद्या ट्रेकवर निघालो, की मग हे पुस्तक त्या त्या स्थळाची माहिती देताना तो भाग, त्याचा नकाशा, नाशिकहून जाण्याचा मार्ग, प्रवासाची साधने, जवळचे गाव, तिथून त्या गिरिशिखरावर चढाईचा मार्ग, उंची, वाटेतील खाणाखुणा, प्रेक्षणीय जागा, इतिहास-भूगोल, भवतालातील आकर्षणे अशी सारी माहिती देते. ही सारी माहिती मोजक्याच शब्दांमध्ये आहे. यासाठीही भाषेचा फुलोरा असण्यापेक्षा उपयुक्ततेला प्राधान्य दिलेले आहे. या माहितीच्या जोडीलाच राहण्याची जागा, जेवणाची सोय, पेट्रोलपंप-गॅरेजच्या जवळच्या जागा, वैद्यकीय सुविधा या साऱ्या गरजेच्या आणि महत्त्वाच्या गोष्टींची नोंद या प्रत्येक प्रकरणात घेतलेली आहे.
उत्तम, केवळ सुंदर अशी छायाचित्रे तर या पुस्तकाचा आत्माच म्हणावा लागेल. खरेतर हे पुस्तक अशा सौंदर्य छायाचित्रांचा खजिनाच आहे. केवळ या छायाचित्रांच्या प्रेमात पडून पाठीवर सॅक टाकत एखाद्या डोंगरयात्रेवर निघावेसे वाटते.. एका पाठीमागे उलगडत जाणाऱ्या त्या डोंगररांगा, विविध ऋतू-प्रहरांमध्ये न्हालेली ती गिरिशिखरे, त्या पर्वतांचे गूढ-रम्य आकार, भोवतीचे ऐतिहासिक अवशेष, जैवविविधता, रस्ते, खेडी-माणसे, नद्या-नाले, जंगल आणि आकाश या साऱ्या विषयांना अमृतकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून वेगवेगळय़ा रंगांचे तरल भाव बहाल केले आहेत. नाशिकच्या या भूगोलाला सुंदर केले आहे!
माहिती, उपयुक्त संदर्भ, नकाशे आणि उत्तम छायाचित्रांच्या या संग्रहातून नाशिकचा हा 'ट्रेकिंग इनसायक्लोपीडिया' चांगलाच सजला आहे.
(पुस्तकासाठी संपर्क- ९४२०००२२११)

Monday, November 12, 2012

परदेशी गिर्यारोहक स्टीव

आल्प्सपासून हिमालयापर्यंत वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करणारे परदेशी गिर्यारोहक बहुधा वर्षभर गिर्यारोहणातच रमत असावेत असं आपल्याला वाटेल. एकट्याने आणि तेही कृत्रिम प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट के टू हे कठीण दुसऱ्या क्रमांकांचे शिखर यासह सुमारे पाच दशकं गिर्यारोहणात रमलेल्या स्टीव स्वेन्सन यांच्याबद्दल असाच समज होऊ शकला असता. मात्र स्टीव यांनी आपली हयात इंजिनीअर म्हणून नोकरी करण्यात घालवली आणि ते करतानाच त्यांनी सर्वांपेक्षा काकणभर जास्त आव्हानं पेलतच गिर्यारोहण करायचं हे ब्रीद कायम ठेवलं. सासेर कांगरी या अगदी आताआतापर्यंत अजिंक्य राहिलेल्या शिखरावर त्यांनी केलेलं आरोहण हे अशाच दिव्यातून पार झालेलं. त्याचीच कहाणी ऐकवायला स्टीव मुंबईत आले होते. 

मार्क रीचीच्या नेतृत्वाखाली स्टीव यांनी २००९ मध्ये काराकोरम रांगांमधील ७५१८ मीटरचं सासेर कांगरी २ 'हे शिखर काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा ऑगस्ट २०११मध्ये मार्क स्टीव आणि फ्रेडी विल्किन्सन अशी त्रयी सासेर कांगरी काबीज करण्यासाठी निघाली. या मोहिमेत स्टीव यांनी कृत्रिम प्राणवायू तर घेतला नव्हताच ,पण बिव्हॉकिंग हे अचाट तंत्रही वापरलं. अत्यंत अरुंद कड्यांवर दोरांनी तंबू बांधून स्वतःला जवळपास लटकवून घेत रात्रीचा विश्राम करायचा आणि पुन्हा आरोहण सुरू करायचं. हे तंत्र रशियन आरोहकांकडून आपण शिकलो आणि त्यात थोडे बदल केल्याचं स्टीव सांगतात. या मोहिमेत शिखरचढाईपासूनच स्टीवना सर्दीखोकल्याचा प्रचंड त्रास जाणवत होता. उतरताना भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरनेच त्यांची सुटका केली. दुखणं अंगावर काढण्याचा निर्णय कदाचित महागही पडला असता. पण त्यावर स्टीव म्हणतात , ' आपलं शरीर दरवेळी आपल्याशी बोलतं आणि त्यामुळेच आणखी ताण ते सहन करू शकेल असं मला वाटत होतं. दरवेळी कृत्रिम प्राणवायूशिवाय जाण्याचा स्टीव यांचा निर्णयही अशाच कणखरपणाचा भाग असतो. कृत्रिम प्राणवायू घेणं म्हणजे एखाद्या सायकलपटूने परफॉर्मन्ससाठी उत्तेजक पदार्थ घेण्यासारखं आहे असं थेट भाष्यच स्टीव करतात. अर्थात कृत्रिम प्राणवायू वापरणाऱ्यांवर टीका करायची नाही असंही सांगतात. साहसाचं असं वेड ल्यालेल्या स्टीवना त्यांची पत्नी नेहमी बजावून सांगते , ' यू हॅव टू कम बॅक अलाइव्ह अदरवाइज आय वुईल कील यू...! 

संवेदनशून्य विक्रमांवर स्टीव तीव्र नाराजी व्यक्त करतात. गिर्यारोहणात व्यापारीकरण आलंय त्यालाही माझा विरोध नाही. पण शिखरमाथा गाठायचा हेच उद्दिष्ट आणि मग वाटेत एखादा मरणप्राय गिर्यारोहक आला तरी त्याला मदतही करायची नाही या अपप्रवृत्ती मात्र मन विषण्ण करतात ', असं मत ते नोंदवतात. दोन्ही पाय गमावून एव्हरेस्ट सर करणारा मार्क इंग्लिस यालाही शिखरचढाईच्या अंतिम टप्प्यात नेमक्या याच प्रवृत्तींमुळे टीकेच्या मोहोळाला सामोरं जावं लागलं होतं. एकमेकांना बरोबर घेऊन जाणं हा खरंतर गिर्यारोहणाचा पाया. शिवाय रौद्रभीषण निसर्ग काय चमत्कार दाखवेल ते कधीच सांगता येत नाही. पण विक्रमांची नशा डोक्यात शिरली की शिखरमाथा तेवढा दिसतो पायाखालची जमीन दिसत नाही. अनुभवी स्टीवची चिंता त्यामुळेच महत्त्वाची ठरते.