Showing posts with label सह्याद्रीतील भटकंती. Show all posts
Showing posts with label सह्याद्रीतील भटकंती. Show all posts

Saturday, June 1, 2024

वैभवशाली सुवर्णदुर्गाची सफर

 




  मराठी आरमारी इतिहासाचा मानबिंदू 'सुवर्णदुर्ग' 



कोकणातील सुवर्णदुर्ग महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे.

स्वराज्याच्या आरमाराचे वैभव असलेला व सागरी लाटांशी झुंजत उभ्या असलेला दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग आहे.महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जलदुर्ग. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ हा किल्ला आहे


सुवर्णदुर्ग या जलदुर्गाच्या रक्षणासाठी हर्णेच्या किना-यावर कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा गड या तीन उपदुर्गांची साखळी उभी ठाकलेली आहे.कनकदुर्गाला वळसा घालून एका छोट्या खडकाळ टापूला बगल देऊन बोट वायव्येला सुवर्णदुर्गाकडे निघते.उजवीकडे आपल्याला कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवा किल्ल्याची तटबंदी दिसत राहते. बोटीने किल्ल्यापर्यंतचा प्रवास १.५ किलोमीटर लांब आणि अंदाजे २० मिनिटांचा होतो. समुद्राचे पाणी तसे शांत असल्याने आमची बोट अलगद पुढं जात होती. आता सुवर्णदुर्गाची तटबंदी स्पष्ट दिसू लागली.आपली बोट दुर्गाच्या उत्तर पूर्व दिशेला असलेल्या वाळूच्या पुळणीवर जाऊन थांबते.


हा किल्ला साधारणतः आठ एकर जागेत पसरलेला आहे.  समुद्रसपाटीच्या पातळीवर अगदी सपाट अशा खडकावर मधल्या उंचवट्याचा खडक तासून, त्याच्या माथ्यावर दगडी चिरे बसवून हा किल्ला बांधलेला आहे. अखंड तटबंदी बांधलेल्या या किल्ल्यास खूप बुरुज व फक्त दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या पूर्व दिशेला मुख्य महादरवाजा आहे पण तो सहज दिसत नाही.शिवकालीन दुर्गबांधणीचे हे वैशिष्ट्य मानले जाते.दरवाज्याकडे जाण्यासाठी पाय-या आहेत त्या जिथे सुरू होतात तिथे वाळूची पुळण आहे. या पुळणमध्ये मोडून पडलेल्या जुन्या तोफा आहेत. द्वाराच्या उजव्या तटावर डोक्यावर शेपटी घेतलेल्या युद्ध मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. 

उंब-याच्या अलीकडच्या पायरीवर कासव कोरलेले  आणि दारावर गोमुख आहे. दरवाजाच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला रक्षक खोल्या आहेत. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे आहेत.गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.

 


किल्ल्याच्या पश्चिम दिशेला तटबंदीला लागून खोल खड्ड्यासारखा भाग आहे. तिथं गेल्यानंतर काही फूट खाली उतरून तटबंदीत एक दार केलेलं दिसतं. महादरवाजाच्या विरुद्ध दिशेला असलेलं हे दार एका छोट्याशा भुयाराकडं घेऊन जातं. या भुयारातून समुद्राच्या दिशेने काही पाय-या उतरत जाताना दिसतात.या पायऱ्यांनी खाली उतरून गेल्यावर तटबंदीतून खाली समुद्राकडे उघडलेले दार दिसते. इथं पूर्वी खाली उतरण्यासाठी पाय-या असाव्यात. जमिनीपासून साधारण १० फूट उंचावर हा चोर दरवाजा आहे. समुद्रातील कातळाच्या पायाला तासून बांधलेली भक्कम तटबंदी इथून अजूनच राकट भासते.


किल्ल्यात बोरी बाभळीची झाडे माजलेली असून किल्ल्याच्या उत्तर भागात कोठार सदृश इमारतीचे अवशेष दिसतात. तिथं एक वटवाघळांनी भरलेलं झाडही आहे. जुनी टाकी आणि तलाव पाहून लक्षात येतं की इथं पूर्वी गोड्या पाण्याची मुबलक सोय असावी. आज मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आपल्याला स्वतः पाणी घेऊन जावं लागतं.परतीचा प्रवास आलेल्या बोटीनेच करावा लागतो.किल्ला पाहण्यास फक्त अर्धा ते पाऊण तास  मिळतो.एवढ्या वेळात संपूर्ण दुर्ग पाहून होत नाही.  

 `


या किल्ल्याचं राकट रांगडं बांधकाम पाहत राहावंसं वाटतं. जाणवतं की या वास्तूने मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी आणि काळेकुट्ट असे दोन्ही प्रकारचे क्षण अनुभवले आहेत.आणि शेवटी तो इंग्लिशांच्या ताब्यात गेला.पोर्तुगीज, इंग्रज, डच, आदिलशहा, मुघल, सिद्दी अशा सगळ्या सत्तांना तोंड देण्यासाठी या आरमाराचा मोठा उपयोग मराठा साम्राज्याला झाला होता.


आज भारताच्या आरमारी इतिहासाचा मानबिंदू असलेला हा दुर्ग काहीसे दुर्लक्षित आयुष्य जगतो आहे. समुद्रावर सत्ता गाजवणा-या मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार किल्ले सुवर्णदुर्गाला दुर्गप्रेमींनी जरुर भेट द्या...

कुरवंडे घाटातील थरारक उतरण

 





             बोरघाट ते उंबरखिंड व्हाया कुरवंडेघाट

खोपोलीतल्या ट्रेकर ग्रुपने आयोजित केलेल्या या ट्रेकची माहिती मिळाली. खंडाळ्यातील मस्त थंडीत व धुक्यात हा ट्रेक करण्यास मिळणार असल्याने मित्रांना तयार केले. या ट्रेकमध्ये इतिहासाच्या काही गोष्टी पाहवयास मिळणार होत्या आणि बोरघाटतून जुन्या पायवाटेने  चढणार होतो व कुरवंडे घाटाने उंबरखिंडीत उतरणार असल्याने दोन्ही घाट जवळून पाहता येणार होते.

सकाळी खोपोलीतील गगणगिरी महाराजांच्या मठाच्या शेजारी वेगवेगळ्या भागातून आलेले ट्रेकर जमले, ओळख परेड झाल्यावर ट्रेकसंबंधी सुचना देण्यात आल्या. शिवगर्जना देऊन ट्रेकला छान वातावरणात सुरुवात केली. बोरघाटातील पाऊल वाटेवर खोदलेल्या पाय-या चढव्या लागल्या. थंड वातावरणात ताज्या दमात पटापट चालत पुढे दोन तीन रॉकपॅच चढून गेल्यावर चहानाष्टा केला. 

पोटात भर पडल्याने ताकद आल्यासारखे सर्व ट्रेकर जोमात चढू लागले. काही भाग चढून गेल्यावर आम्ही मंकी हिल येथे पोहचलो. तेथून पुढे काही अंतर रेल्वेमार्गावरून चालवे लागल्याने सुरक्षितपणे तो रेल्वे मार्ग ओलांडला. पुन्हा पाऊलवाटेने चालण्यास सुरुवात केली. उभी चढ चढत बोरांच्या झाडांमधून वाट काढीत खोपोली ते खंडाळा या रस्त्याला लागलो.बोरघाट बरासा चढून आलो होतो. थोडी विश्रांती घेऊन रस्त्याने खंडाळ्याच्या दिशेने पादक्रमण सुरु केले.सह्याद्री डोंगरामध्ये असलेल्या बोरघाटाला आता ’खंडाळा घाट’ बोलले जाते. रेल्वे किंवा बसने प्रवास करताना हा घाट पाहिला होता. पण हा घाट पायी चढलो होतो यावर विश्वास बसत नव्हता. विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा घाट पाहता आला.

खंडाळा तेथील राजमाची पॉइंटहून रस्त्याने चालतचालत टाटा पावर प्लांटला पोहचलो. रस्त्यावर चालावे लागल्याने हा प्रवास कंटाळवाणा झाला. दुपारची वेळ असल्याने खूप गरम होत होते. प्लांटमधून पाणी भरून घेतले व पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.उन्हं चढली होती.जंगलातून आता बाहेर पठारावर आलो होतो.येथे खंडाळा घाटातील नवीन बोगद्याचे काम सुरु आहे.जेवणाची वेळ झाल्याने जवळ एका मोठ्या झाडाखाली जेवण केले.थोडीशी विश्रांती घेतली.   

नागफणीच्या पदरात येताच खाली उतरणारी वाट दृष्टीस पडली. कोकणात उभेच्या उभा उतरणारा हाच कुरवंडा घाट. आता कुरवंडे गावाला मागे टाकून पुढे कुरवंडे घाट उतरण्यास सुरुवात केली. सरळसोट उतार, बाजुला खोळ दरी,वाटेवर बारीक खडीवरून दरीत घसरण्याची भिती आणि टोक्यावर तापलेली उन्हं अशा कठीण परिस्थितीत सावकाश ठराविक अंतर ठेवून उतरत  होतो. बोरघाट चढण्यास त्रास झाला नाही पण कुरवंडे घाट उरण्यास खूप त्रास झाला. काही वर्षांपूर्वी हा ऐतिहासिक घाट कोकणातून घाटावर जाणारी पाईप लाईन टाकण्यासाठी फोडून काढलाय.त्यावरुनच आपल्याला उतरावे लागते. सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आम्ही  चावणी गावापाशी आलो.साधारण कुरवंडे पासून दोन तासात आम्ही चावणी या घाटाच्या पायथ्याशी असणा-या गावात येऊन पोहोचलो. चावणी हा शब्द कदाचित छावणी या शब्दावरून आला असावा असे वाटते. चावणी गावात जाण्यासाठी अंबा नदीचे पात्र ओलांडावे लागले. पुढे चावणी गावात पोहोचल्यावर इतिहासाचा मागोवा घेत एका शौर्याचा देदीप्यमान वारसा असलेल्या स्मारकाचे दर्शन घेऊन मन कृतकृत्य झाले.

शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता.अशा या ऐतिहासिक उंबरखिंडीला भेट देण्याची आणि तो प्रदेश स्वतःच्या डोळ्यांनी जवळून पाहण्याचा योग जुळून आल्याने हा प्रवास अविस्मरणीय प्रवास झाला.              

Saturday, March 16, 2024

धोडपगडाचे रुप भावलं



 


किल्ले ’धोडप’ चा ट्रेक 



ब-याच दिवसापासून धोडप गडावर जाण्याची मोहीम आखत होतो. पण हा किल्ला नेहमीच आम्हाला हुलकावणी देत असल्याने ह्या गडाचा ट्रेक सारखा खुणवत होता.शेवटी एकदाचे ठरले आणि आम्ही जण निघालो.प्रवास लांबचा असल्याने खासगी बसने रात्रीचा प्रवास करुन पायस्थाशी असलेया ’हट्टी’ या गावात पहाटे पोहोचलो.गावात असलेल्या वनविभागाचे 'निसर्ग पर्यटन केंद्रात चहापाणी करून ट्रेकला सुरुवात केली.


महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच गिरिदुर्ग आहे.सह्याद्रीची पूर्वपश्चिम असलेल्या सातमाळ या डोंगररांगेतील शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप ट्रेकरांना भुरळ घालतो.धोडप गडाचा बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. त्यालाच लागून तयार झालेल्या सरळसोट भिंतीमध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. लांबून गडावरील या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या.या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी चढाईचे आव्हान स्विकारत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत चढाईला सुरुवात केली.          



गावाला पाणी पुरवणा-या घरणाच्या पाण्यात पहाटेची सुर्याची किरण पडलेल्या धोडप किल्ल्याचे प्रतिबिंब पाहत पाहत ट्रेकची सुरुवात केली.पहाटेचे वातावरण व निसर्ग प्रसन्न करणारा होते.गडावर जाण्यापूर्वी मारुतीरायांचे दर्शन घेऊन पुढे निघालो.काही अंतर चढून गेल्यावर एक जुनी पाय-यांची बारव (पायविहीर) आहे. या बारवेची बांधणी संपूर्ण दगडात चौकोन आकाराची असून पाण्यात उतरताना खालील कमानीची रचना मंत्रमुग्ध करून टाकते.

सर्व बांधकाम अजून शाबूत आहे,हे विशेष. 


मोठ्या मोठ्या चढणी पार करून दमछाक होत होती.पुढे गेल्यावर एक छोटे तळे ( गणेश टाकं ) आले तिथे एक छोटी गणपतीची मूर्ती होती.परिसर छान व पवित्र वाटल्याने आम्ही गणपतीची आरती करुन आमचा ट्रेक चांगला होऊ दे अशी प्रार्थना केली. या पुढे रास्ता अजून कठीण होत जाणार होता आणि सूर्य ही हळू हळू डोक्यावर येत होता.


ह्या मंदिरांपासून पुढे पंधरा वीस मिनिट सरळ चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्‍यांसाठी देवड्या आहेत.


 वाट अवघड होऊन बसल्याने त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावली आहे. आम्ही दोन बुरुजांपांशी पोचलो आणि पुढे दगड कोरून बांधलेला दरवाजा आला. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. दरवाजाच्या परिसरात काही शिलालेख आढळले.  तिथून पुढे कोरीव पायऱ्यांच्या वाटेनं पुढे गेल्यावर गडाचा दुसरा, कातळात कोरलेला दरवाजा लागला. संरक्षणाच्या दृष्टीनं लपवलेल्या प्रवेशद्वाराशेजारी आपल्याला दोन शिलालेख दिसला. दरवाजातून पुढे गेल्यानंतर बालेकिल्ल्यावरील वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्याची बरीच पडझड झालेली दिसली. छतही कोसळलं आहे. त्यावरील बारीक नक्षिकाम आपल्याला गडाच्या गतवैभवाची झलक दाखवतं.वाड्याशेजारीच पाण्याची दोन टाकी पाहिली. 


बालेकिल्ल्याच्या डाव्या हाताच्या वाटेनं पुढे गेल्यावर आपल्याला डोंगराच्या पोटात अनेक गुहा कोरलेल्या दिसतात. यातील एका गुहेत भवानीमातेचा तांदळा दिसतो.सर्व गुहा पिंडीच्या आकाराच्या कातळाच्या पायथ्याशी आहेत. त्यामधील सर्वात शेवटची गुहा राहाण्यायोग्य आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच टाकं देखील आहे. गुहेत देवीची मुर्ती बसवलेली आहे. या गुहेपासून सरळ चालत पुढे गेल्यावर धोडप किल्ल्याच्या सुप्रसिध्द कातळात असलेल्या नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूला पोहोचतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. धोडप किल्ल्यावरून पश्चिमेला रवळ्या-जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी हे गड दिसतात. पूर्वेला हंड्या, इखारा हे सुळके आणि कांचना गड दिसले.उत्तरेला कण्हेरगड व साल्हेर पाहायला मिळाले.


किल्ल्याचा विस्तार बर्यापैकी मोठा आहे. तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, राजवाडे, विहिरी अश्या अनेक वास्तूंनी धोडपला सुंदर सजवलं आहे. किल्ल्यावरील बांधकाम बघता हा किल्ला फार प्राचीन आहे ह्याची जाणीव होते. बांधकामातील विविधते वरून हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीखाली असल्याचे लक्षात येते.



धोडप हा किल्ला एकदम देखणा आणि रांगडा आहे.दुर्ग प्रेमींसाठी आणि हौशी छायाचित्रकारांसाठी हा किल्ला नेहेमीच एक आकर्षण राहिला आहे.सारे अवशेष आणि धोडपचं रांगडं रूप मनात साठवत आम्ही परतीच्या वाटेला लागलो.


निसर्गाने आणि इतिहासाने सुदधा मुक्त हस्ताने उधळण केलेला एक नितान्त सुंदर दुर्ग पाहण्यास मिळाला. 


Wednesday, October 18, 2023

भेटण्याची ओढ

 






   भेटण्याची ओढ


आम्ही ऐशी व नव्वदच्या दशकात  मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या स्पोर्ट्स क्लब तर्फे सह्याद्रीत ट्रेकिंगला जात होतो. वरिष्ठ ट्रेकरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टेकिंग केल्याने आम्हाला शिकायला मिळाले. ट्रेकिंग करता करता आमची घट्ट मैत्री कधी  झाली ते कळलेच नाही. एक मोठा ग्रुप झाला. महिन्यातून  दोनदा कोणत्यातरी गडावर 
भेट व्हायची. आमच्या ग्रुपमधले काहीजण बाहेरच्या ग्रुप बरोबर मोठमोठ्या ट्रेकला जाऊ लागले. आमच्या ग्रुपमध्ये काही नवीन ट्रेकर्स सामिल झाल्याने नवा ग्रुप तयार झाला. जुन्या ग्रुपमधल्या काही ट्रेकर्सची भेट होत नव्हती. ते सर्व ट्रेकर्स मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सेवेतून सेवानिवृत होऊनही ट्रेकिंग करीत आहेत. जवळजवळ तीस वर्षांनी सर्वांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने भेटण्याची ओढ वाढली होती.  

 १८ जुलै २०२३ ला  संजय नलावडे च्या धोलवड येथील त्याच्या नवीन घरी भेटण्याचे ठरले. श्रीधर दळवी,अजित धोंड,राजन फाटक,शशी नलावडे,हेमंत वरळीकर , सतिश चव्हाण ,हेमंत जोशी आणि मी, आम्ही कल्याणला भेटलो व संजय नलावडे च्या घराच्या दिशेने प्रवास सुरु केला. राजन फाटक याने दोन दिवसाची रजा काढून आम्हाला भेटण्यास आला होता. पूर्वी वाहतुकीची साधने कमी असल्याने नेहमीच आम्ही एसटीने प्रवास करीत 
ट्रेक करायचो. ते दिवस व तो प्रवास वेगळाच असायचा. त्या दिवसांच्या आठवणी करीता आताही एसटीने प्रवास करायचे ठरले होते. पाऊस जोरात  पडत होता तरीही सर्व मंडळी भेटण्याच्या ओढीने आली होती. प्रवासात एकमेकांची विचारपूस झाली व खूप गप्पा झाल्या.  मालशेज घाटातून प्रवास सुरु झाल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या.या परिसरात आम्ही बरेच ट्रेक केले होते.    

ओतुर येथील श्री कपार्दिकेश्वर या शिव मंदीरात जाऊन दर्शन घेऊन आमच्या सहलीची सुरुवात केली. भोजन करुन आम्ही संजय नलावडे च्या ’श्रीहरी’ या बंगल्यात पोहचलो. आमच्या मित्रांनी भव्य वास्तू बांधल्याने आम्हाला त्याचा अभिमान वाटला. बंगला पाहिला. कोणीही विश्रांती न घेता गप्पा केल्या. तब्तेतीमुळे काही मित्र आमच्यात सामिल होऊ न शकल्याने आम्हाला वाईट वाटले. आम्ही आमच्या सर्वांचे फोटी ग्रुप वर शेअर केल्याने त्यांनाही  सहलीची माहिती मिळत गेली. त्यांनाही या भेटीत आपल्याला सहभागी न होता आल्याने खंत वाटली. संध्याकाळी ओझरच्या  ’विघ्नहर’ बाप्पाचे दर्शन घेतले.

जेवल्यानंतर रात्री गप्पांचा फड बसला. अजित धोंड यांनी केलेल्या हिमालयातील ’चदर ट्रेक’ व ’ कैलास परिक्रमा’ या ट्रेकचे फोटो पाहून त्याचे अभिनंदन केले. कोणालाही झोप येत नव्हती. जुन्या ट्रेकमध्ये केलेल्या दंगामस्ती आठवून मजा केली. उद्या 
 छोटासा  ट्रेक करायचे ठरवून आम्ही उशिरा झोपलो.

पहाटे लवकर उठून तयारी करुन आम्ही ’ शिवनेरी’ गडाच्या दिशेने निघालो. पाऊस नुकताच पडून गेल्याने वातावरण प्रसन्न वाटले . हिरवाई ओसंडून वाहत होती.  चढाईला सुरुवात केली. जुने दिवस आठवत होते.  तीस वर्षापूर्वी आम्ही कसे होतो आणि आता कसे आहोत याची जाणीव होत होती. आठवणीसाठी फोटो काढत गडावर पोहोचलो. जिजाऊ मातेच्या स्मारकाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. आम्ही भारावून गेलो.आमचे मन भरल्यानंतर आम्ही गडावरुन खाली उतरलो.

मुंबईत पाऊस जोरात पडत असून रेल्वे बंद असलेल्याच्या बातम्या आल्यावर आम्हाला चिंता वाटू लागली. जून्नर परिसरात पाऊस नसल्याने आम्ही लेण्याद्री येथील लेण्यातील ’गिरिजात्मक’ बाप्पाचे दर्शनाला निघालो. दुपारची वेळ असल्याने पाय-या चढताना दम लागला. गुहेत पोहचल्यावर बाप्पाच्या दर्शनाने थकवा दूर झाला. खाली उतरून भोजन केले व परतीचा प्रवास सुरु केला. संजयच्या पाहुणचाराने आम्ही खूष झालो.

या भेटीने सर्वांना आनंद झाला होता. मैत्री असीच टिकवायची अशी वचने नकळत दिली गेली. प्रवासात पावसाचा कोठेही त्रास झाला नाही. पुढच्या भेटीची आखणी करीत मुंबईत सुखरुप  पोहचलो. आमच्या भेटीचे दोन दिवस कायमचे आमच्या स्मरणात राहतील.


Wednesday, July 6, 2022

आम्ही ट्रेकर्स!

'आम्ही ट्रेकर्स!’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रातील ’कट्टा आमचा हक्काचा’ या सदरात दि. ०६ जुलै २०२२ रोजी प्रसिध्द झाला आहे. 






मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबचा ट्रेकिंग या साहसी खेळाचा एक ग्रुप आहे. गेली तीस वर्षात या ट्रेकिंग ग्रुपने  सह्याद्री व हिमालयात मोहिमा आखून यशस्वी केल्या आहेत. प्रत्येक ट्रेकला मोठ्या संख्येने ट्रेकर सहभागी होतात. लहान मुलं, महिला व सेवानिवृत कर्मचारी देखील ट्रेकमध्ये कायम सामील होतात. सर्वांना निसर्गात नेऊन इतिहासाची ओळख करीत सुरक्षित ट्रेक करणे हा ग्रुपचा मुख्य हेतू असतो.तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टचा १५० वा वर्धापन दिन....२६ जून १८७३ रोजी असल्याने विश्वविख्यात संस्थेचा स्थापना दिवस. खास या दिनाचे औचित्य साधून मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब ने आयोजित केलेला ही मोहिम पूर्ण करुन हा स्थापना दिन साजरा केला.

गेल्या दोन ते अडीच वर्षात करोनामुळे एकाही ट्रेकमध्ये कोणालाच सहभागी होता आले नव्हते. या वर्षी पावसाळा सुरु झाल्याबरोबर सर्वांनी ट्रेकला जाण्याची तयारी सुरु केली. यंदा सर्व मित्रांना भेटण्याची संधी गमवायची नव्हती. सर्व मित्रमंडळींना ब-यास दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटण्याची आस लागली होती. शहापूर जवळील "आजोबा" पर्वतावरील "सितामाईचा पाळणा ट्रेक" करण्याचा बेत आखला गेला. ट्रेक मोठा न ठेवता सर्वांना एकत्र भेटता यावे म्ह्णून हा ट्रेक ठरवला. सोशल मिडियाच्या मदतीने सर्व ट्रेकर्स माहिती देण्यात आली. कधी एकदा सह्याद्रीत जाऊन मित्रांना भेटतो असे झाले होते.उत्साह खूप वाढला होता.

कसारा लोकलमध्ये सर्व ट्रेकर्स ठरलेल्या डब्यात चढत होते. एकामेकांना मिठ्या मारत होते. ते पाहून आंनद झाला. सर्वांनी मित्रांसाठी आपल्या सॅक भरून खाऊ आणला होता. आसनगाव - शहापूर आणि पुढे जीपने प्रवास करीत वाल्मीकी आश्रमात पोहचलो. सर्वांनी एकमेकांची खुशाली घेतली व नव्याने  सामील  झालेल्यांची ओळख करून घेतली. विविध वयोगटातील जेष्ठ व नव्याने सामील झालेल्या सुमारे पन्नास ट्रेकर्संनी या ट्रेकला हजेरी लावली. 

आश्रमाचा जवळचा परिसर रम्य आहे. या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचे मंदिर, कालभैरव , शंकर मंदिर आणि काही वीरगळ व समाधी शिळा पाहिल्या. या आश्रमा मागून धबधब्याच्या वाटेने चढण्यास सुरुवात केली. घनदाट  जंगल असल्याने वर चढताना उन्हाचा त्रास झाला नाही. पाऊस नसल्याने खूपच गरम झाले. तासा दिड तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. येथे डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी १५ फ़ूटाचा छोटा रॉक पॅच आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवल्याने गुहेपर्यत पोहचणे सुरक्षित झाले आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर खडकात कोरलेल्या लवकुशाच्या पादुका दिसतात. तेथेच लव कुशांचा पाळणा लावलेला आहे. आजची रात्र येथेच गुन्हेत राहावे असे सर्व ट्रेकर्स वाटत होते.

थोड्यावेळाने खिंड धुक्यात गेली. जोरात गार वारे वाहू लागल्याने चढतान आलेला थकवा दूर झाला.फोटोग्राफी झाली गाणी झाली. तथेच पोटपुजा करून खाली उतरू लागलो. उतरताना पावसाचा अभिषेक सुरु झाल्याने भिजण्याचा आंनद घेता आला. मोठा पाऊस झाला नसल्याने खाली वाटेत असलेल्या धबधब्याला पाणी नव्हते. ट्रेकचा थकवा दूर करता न आल्याने त्या आंनदापासून दूरावलो.    

ह्या ट्रेकचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटल्याने हा ट्रेक सर्वांच्या आठवणीत राहील. पुढच्या ट्रेकची आखणी करत घरचा प्रवास सुरु केला. 

Thursday, August 26, 2021

ट्रेकर्ससाठी एक पर्वणी

 






                                      ‘कलावंतीण’ दुर्ग   


 नावाप्रमाणे प्रबळ आणि भव्य गडाच्या बाजुला दिमाखात उभा असलेला ‘कलावंतीण’ चा बुरुज. अतिशय सुंदर भौगोलिक परिसर आणि कलात्मक पायऱ्या ह्यामुळे “कलावंतीण दुर्ग” ट्रेकर्स मध्ये प्रिय आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे.

पुणे-मुंबई हमरस्त्यावरून  दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची  जाणीव करून देणारा बुरुज. कलावंतीणसुळका हे प्रबळगडा शेजारील एक सौंदर्यस्थळ आहे. पनवेल मधून १५ किमी अंतरावर माथेरान डोंगर रांगेत ’प्रबळगड’ व ’कलावंतीण’ बुरुज वसलेले आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर पनवेल हून ७-८ किमी गेलो कि ’शेडुंग’ फाटा लागतो. या फाट्यावरून डावीकडे वळण घेतले कि त्याच रस्त्याने पुढे यावे.छोट्याशा प्रवासानंतर लोणीवली वाडीला जाणारा डावीकडे अन ठाकूर वाडीकडे जाणारा उजवीकडील मार्ग लागेल. 

माचीच्या पायथ्याशी ’गणपती’ व ’हनुमान’ यांचे उघडे मंदिर लागते. दर्शन घेऊन पुढे आलो कि एक पठार (प्रबळमाची) लागते.’शेडुंग’  मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते.गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते.’कलावंतीण’ बुरुज हा खालून पहिले असता छोटासा सुळका वाटतो पण जस जसे आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला त्याच्या भयानकेतेची महती कळते. 

पायवाटेने प्रबळवाडीची वस्ती मागे सोडून आलो कि उजवीकडील वाट ’प्रबळगडा’ साठी तर  डावीकडील वाट ’कलावंतीण’ साठी जाते. डावीकडील वाट पकडावी.घनदाट जंगलातून वाट काढत आपण प्रबळ व कलावंतीण यांच्यामधील घळीमध्ये जाऊन पोहोचतो.डोंगरात खोदलेल्या सरळ असलेल्या पायऱ्या हे ’कलावंतीण’ चे मुख्य वैशिष्ट्य व आर्काषण आहे. इथून कलावंतीण चा सुळका, कातळात खोदलेल्या पायऱ्या फारच आकर्षित करत असतात. या पायऱ्या इतक्या कौशल्याने खोदल्या आहेत कि चढणाऱ्या आणि उतरणा-याला अजिबात दृष्टीभय वाटत नाही. त्याबाबतीत त्या अज्ञात शिल्पकाराला शतश: प्रणाम !!

प्रबळगडाकडे पाठ करून आपण डोंगरकपाऱ्यांच्या आधाराने काही उंचीवर खोदलेल्या पायऱ्या गाठतो. या पायऱ्या दगडात व्यवस्थित कोरल्या आहेत. एका बाजूला खोल दरी असल्यामुळे इथून जाताना जरा सावकाश चढाई करावी लागते.डोंगरात खोदलेल्या एक फुट ते दीड फुट उंचीच्या पायऱ्या चढताना आपल्याला इतिहास काळात जाणे न झाले तरच नवल म्हणावे. ही चढण धोकादायक नाही परंतु एक अत्यंत रोमांचकारक असे वाटते. माथ्यावर पोहोचल्यावर पाहतो तर काय अजून एक सरळसोट खडक आमच्या व कलावंतीण च्या सर्वोच्च टोकावर  जाण्याच्या मध्ये उभा असतो.शेवटी सुळक्याचा माथा गाठण्यास परिश्रम करावे लागतात. 


कठीण वर्गात गणल्या जाणा-या कलावंतीण बुरुजावर आपण चढाई केल्याचा आनंद देखील मनात राहतो.पाठीमागे वळून पाहता प्रबळगडचा विस्तार दिसतो तसेच त्याच्या प्रबळतेची प्रचीती आल्याविना राहत नाही. माथ्यावर पोहचलो कि याला चहुबाजूंनी नजर फिरवावी तेव्हा कलावंतीण हा एक पहारेकरी  होता याची खात्री पटते. कारण, याच्या माथ्यावरून उजवीकडे अग्नेयला माथेरानचे पठार दिसते,  तर ईशाळगड प्रबळच्या मागे लपलेला( जो प्रबळ गडाहून दिसतो), पुर्वेला चंदेरी, विकटगड तर ईशान्येला कल्याणची खाडी, हाजी मलंग यांचे दर्शन घडते. एकाच दिवसात कलावंतीण आणि प्रबळगड एका अविस्मरणीय अनुभवासहित पाहून होतो.



कलावंतीण बुरुज हा “वन डे ट्रेक”चा उत्तम पर्याय असला तरीपण येथे नवख्याने ट्रेकींगसाठी शक्यतो जाऊ नये किंवा गेलातच तर अनुभवी ग्रुप व मार्गदर्शक सोबत असावेत. पावसाळ्यात पाय-यांवर चिखल व शेवाल असल्याने हा ट्रेक जास्त धोकादायक आहे,याचे ट्रेकरनी नोंद घ्यावी”कलावंतीण दुर्ग’चा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात.’कलावंतीण दुर्ग’चे गिर्यारोहण एक पर्वणी आहे


Tuesday, July 14, 2020

अखेर कॅमेरा सापडला.

   




                      अखेर कॅमेरा सापडला.

तोरणा आणि राजगड असा आमच्या मित्रांचा ट्रेक होता. तोरणा आणि राजगड, दोन ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे किल्ले एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणागड. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. तोरणा गडाच्या पायथ्याच्या ’वेल्हे’ गावातून चढाईला सुरुवात करीत बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आम्ही बालेकिल्ल्यात प्रवेश केला. थोडी विश्रांती करुन गडदर्शनास निघालो. झुंजार माची व बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप. बालेकिल्ल्यावर असलेल्या गडदेवता ’मेंगाई’च्या  मंदिरात रात्रीचा मुक्काम केला. दुस-या दिवशी लवकरच  दक्षिण फाटय़ावरील ’भगत’ दरवाजातून डोंगरदांडय़ाच्या रस्त्याने राजगडाला निघालो. यामार्गाने उतरणे कठीण असल्याने आम्ही एकमेकाला आधार देत सुरक्षित उतरुन डोंगरवाटेला लागलो. मित्रांचे फोटो काढणे सुरु असल्याने उतरण्यास वेळ लागत होता.त्याकाळी मोबाईलमध्ये फोटे काढण्याची सोय नव्हती. आमच्यातल्या दोघांकडेच कॅमेरे होते.उन वाढल्याने चांगलेच चटके बसत होते.डोंगरवाटेत झाडे कमी असल्याने छोट्या झाडांच्या सावलीत बसून पाणी पित थोडा आराम करीत पुढचे मार्गक्रमण करीत होतो. राजगड व तोरणागडाच्या खिडींत पोहचलो.आम्ही विश्रांती घेण्यासाठी व आणलेला खाऊ खाण्यासाठी थांबलो. कॅमेरा रस्त्यात राहिल्याचे कॅमेरा असलेल्या मित्राच्या लक्षात आले. त्याने सर्वांकडे कॅमे-याबद्दल विचारणा केली. कोणाकडे संबधीत माहीती मिळाली नाही.कोठे राहीला असेल याबद्द्ल त्याला काहीच आठवत नव्हते. कॅमेरा ब-याच किंमतीचा असल्याने तो मित्र नाराज झाला. तोरणागडावरून मोठा पल्ला मारत इथपर्यत पोहचलो होतो.पाठीमागे जाणे व कुठपर्यत जाणे याची कल्पना येत नव्ह्ती.त्यावेळी काय करायचे काहीच सुचत नव्हतं. आमच्यातला एक मित्र कॅमेरा शोधण्यासाठी मागे जाण्यास तयार झाला. पण ज्याचा कॅमेरा हरवला तो थकल्यामुळे स्वत: व मित्रालाही कॅमेरासाठी मागे पाठवण्यास तयार नव्हता. 

त्याचवेळी दोन ट्रेकर राजगडावरून खाली उतरुन तोरणागडाच्या दिशेने निघाले होते. ते दोघे आम्ही आलेल्या वाटेनेच तोरणागडावर जाणार होते. त्या ट्रेकरशी बोलताना, आम्ही आमचा कॅमेरा मागे वाटेवर राहील्याचे त्यांना सांगितले. तुम्हाला वाटेत कॅमेरा सापडला तर आम्हाला आमच्या मोबाईलवर कळवा. पुढे काय करायचे ते नंतर ठरवू. ते दोघे ट्रेकर निघून गेले. आराम करुन निघण्याच्या वेळेला त्या ट्रेकरचा फोन आला. आम्हाला आपला हरवलेला कॅमेरा झाडावर अडकवलेल्या स्थितीत सापडला आहे. आम्ही कॅमेरा घेऊन तोरणागडावर जात आहोत. ज्याचा कॅमेरा हरवला होता, तो खुष झाला. पण आता कॅमेरा मिळवायचा कसा? हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला होता. कॅमे-यासाठी त्यांच्यापर्यत पोहणे गरजेचे होते. कॅमेरावाला मित्र थकल्याने मागे जाण्यास तयार नव्ह्ता.मित्राचा कॅमेरा मिळवण्यासाठी दुसरा मित्र जाण्यास तयार झाला. एकट्याला कसे पाठवायाचे म्हणून सोबतीला आणखी एक मित्र तयार झाला. त्या दोघांना सर्व माहीती,पैसे व खाऊ दिला.ते दोघे निघाल्यावर आम्ही राजगडाकडे कुच केली.कडक उन्हातून उभी चढाई चढताना खुपच त्रास झाला. 
   
चारच्या दरम्यान आम्ही गडांचा राजा ’राजगडा’वर पोहचलो होतो.तोरण्यावरून राजगडावर येण्यासाठी संजीवनी माचीवर आळू दरवाजा हा एकमेव मार्ग आहे.राजगडावरील ’पद्मावती’ देवीच्या मंदिरात आमची राहण्याची सोय झाली. कॅमेरा मिळविण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा फोन आला. तोरणा गडावर गेल्यावर आमचे मित्र त्या दोन ट्रेकरना भेटले व ओळख दिल्यावर त्यांनी कॅंमेरा आमच्याकडे दिला.त्यांनी त्यांचे आभार मानले व ती रात्र त्या मित्रांसोबत गडावर काढून ते सकाळी लवकरच गड उतार होऊन मुंबईला निघाले.      

आम्ही दुस-या दिवशी सकाळी राजगड दर्शन करुन दुपारी गड उतार झालो.या ट्रेकमध्ये हरवलेला कॅमेरा मिळाल्याचा आंनद सर्वांना झाला. पण आमच्यातल्या त्या दोघा मित्रांना राजगडचा ट्रेक करता आला नाही. याचे दु:खही झाले. मुंबईत दोन दिवसानी त्याचा कॅमेरा त्याला दिला पण पार्टी वसुल केली. मित्राला हरवलेल्या कॅमे-यापेक्षा पार्टी महागात पडली होती.ट्रेकचे फोटो बघताना तोरणा राजगड ट्रेकची आठवण कायम येते.  

Monday, October 21, 2019

देवकुंड.....सह्याद्रीतला एक स्वर्गीय अनुभव.






सह्याद्रीत लपलेला अजुन एक सुंदर नजराणा, अनोख्या हिरव्या रंगात भासणारे अत्यंत नितळ, कुंडाच्या आकाराचे तळंच जणू असे हे 'देवकुंड'.भन्नाट सौंदर्याने वेड लावणारा असा हा धबधबा. गंभीर,निरव आणि अंतर्मूख करायला लावणारं शांततेतलं रुप,शंकराच्या पिंडीवर  अभिषेक केल्यासारखा शांत व सतत आदळणारा धबधबा, हवेतले तुषार,अंगावर कोसळू पाहणारे काळेकुट्ट कडे, थंडगार पाणी,गर्द वृक्षवल्ली व बेफान झालेले पर्यटक असे देवकुंडाचं वैभव आहे.आकाशातून     तुषार असे    कोसळतात जसे स्वर्गातून कुणी जलकुंभ पॄथ्वीवर ओतत असल्याने पर्यटकाना देवकुंड खुणावणार नाही तर नवलच.देवकुंड  अतिशय सुंदर  निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं मनाला शांती देणार रमणीय ठिकाण. हा धबधबा निसर्गाचा अदभुद चमत्कार आहे.








रायगड जिल्ह्यातील     माणगाव तालुक्यातील    भिरा गावाजवळील सह्याद्रीच्या रांगेतून  वाहणारा व कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेला  ’देवकुंड’ नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत   असतो. मुंबई व विशेषत: पुण्यापासून काही     तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या 
आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.देवकुंड हा धबधबा म्हणजे केवळ धबधबा नसुन सुमारे सात किलोमिटरचा असा ट्रेक आहे. देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या धरण, तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे.  






भि-यापासून ओढे, डोंगराचे चढउतार पार करुन देवकुंड धबधब्यापर्यत  पोहोचता येते.वाटेवरून जाताना एक दोन कौलारू घरं खुप सुंदर भासली. याच वाटेवर दोन ठिकाणी गावातील लोकांनी   छोटेखानी पाणी सरबत खाऊच्या टपऱ्या मांडल्या होत्या. आता गवताची कुरणं संपून जंगल वाट 
सुरू झाली, तेवढीच उन्हापासून थोडी सुटका. पुढे एक छान मोठा ओहोळ लागला. पाणी वेगात वाहत होते. ओढ्यावरुन जाण्य़ासाठी एक लाकडी  पुल बांधलेला आहे.पावसाळ्यात ट्रेकर्सना याचा वापर    करता येतो.पण तो कमकुवत झालेला आहे. गुडघाभर पाण्यातून दगड गोट्या तून ओढा 
पार करता येतो. तेथून दाट जंगलातील दमवणारी चढण सुरु होते.ही चढण जिथे संपतो तिथुन समोरच भव्य असे दोन कातळ दिसतात.या दोन कातळांना वेगळं करणारी मोठी सांध दिसते, तीच प्लस व्हॅली.या व्हॅलीतून    खाली येणारे पाणी रौद्ररुप  धारण करीत धबधबा निर्माण होतो.या कोसळणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेला मोठाच्या मोठा पन्नास फुट खोल खड्डा   म्हणजे देवकुंड आणि यामध्ये पडणारे पाणी प्रचंड वेगाने पुढे  वाहून नेते ती कुंडलीका नदी. ह्या वाटचालीमध्ये एकाबाजूने अथांग जलाशय, चहुबाजुंनी     सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि गर्द झाडीने नटलेली  वनराई तुम्हाला शेवटपर्यंत साथ देते.




पावसाळ्यात  तिथे   जाणे थोडे  कठीण आहे   कारण जाताना दोन    ओढे लागतात जे पार करणे कठीण आहे.पावसाळा संपल्यावर या ठिकाणी  जाण्यास योग्य वेळ आहे.त्या ठिकाणचे निसर्गसौदर्य खुप छान आहे.







देवकुंडात कोणीही पोहण्यास उतरू नये, तसेच मुख्य धबधब्याच्या      जवळ जाऊ नये. देवकुंडांचे सौदर्य शापित झालयं. दुर्घटनांचा शाप लागला  आहे.अतिउत्साहात केलेलं  धाडस त्यांच्या जिवावर बेतल आहे.धबधबा सुंदर दिसला तरी मनावर ताबा ठेवला पाहिजे.अतिउत्साहात नसतं धाडस करु नये.नाही तर देवकुंडाची वाट थेट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल.शक्यतो जास्त पावसात हा ट्रेक करू नये.अनुभवी नसाल तर गावातून गाईड घेतल्याशिवाय हा ट्रेक करू नये. निसर्गाला देव  मानून त्याचा आदर करून, त्याच्या नियमांना आव्हान न करता जेवढा निखळ आनंद घेता येईल  तेवढा मनमुराद घ्या.






सर्व निसर्गाच्या समृद्धीसोबतच अनेक निसर्गनवल सह्याद्रीत जागोजागी विखुरलेली पाहायला मिळतात.निसर्ग पाहण्यासाठी आपण इतर राज्यात लांबचा प्रवास करीत असतो.पण आपल्या जवळील सुंदर निसर्ग   पाहण्यास फिरकत नाही.आपल्या आजुबाजुला इतका सुंदर निसर्ग असुन देखील  ती पाहण्याची व अनुभवण्याची आपल्याकडे क्षमता   व सोयी सुध्दा नसाव्यात,हे  आपलं दुर्दैव.हा निर्सग पाहण्यासाठी सर्वसामान्यांना तेथे जाऊन अनुभवाता येईल अशा सोयी उपलब्ध व्हाव्यात. 






दि.०३.१२.२०२० महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत हा लेख प्रसिध्द झाला आहे. 

आडवाटेवरील गिरीशिल्प "गणपती गडद’'



दि.२१.०१.२०२१ महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत हा लेख प्रसिध्द झाला आहे. 





            आडवाटेवरील गिरीशिल्प "गणपती गडद’'


 ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्याच्या खेटून असणाया  दुर्ग धाकोबाच्या कुशीत गणपती गडद ही लेणी वसलेली आहेत.निसर्गरम्य गणपती गडद, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावापासून साडेतीन किमी अंतरावर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील ही सुंदर लेणी आहेत.खोदलेल्या या भव्य लेण्यांद्वारे तत्कालीन संस्कृतीची ओळख होण्यास मोठा हातभार लागतो.येथे जाण्यास कल्याण सरळगाव, उमरोली, धसई ,पळु आणि सोनावळे असा प्रवास करावा लागतो.”गणपती गडद” हा माळशेज धारेवरील ढकोबाच्या अंगावर कोरलेला अप्रतिम लेणी समूह याची साक्ष आहे.






सोनावळे गावातून चहापाणी करुन चालण्यास सुरुवात केली.रस्ता हिरवाईने बहरलेला.लाल मातीने वाट रंगलेली.समोरच सह्याद्री ढगात लपलेला व अंगावर धबधब्यांच्या रांगा असा सुंदर नजराणा पाहत अनुभवत लेण्याच्या दिशेने निधालो.वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे.त्यामुळे गावापासून लेण्यांपर्यंतच्या प्रवासात आढळणाऱ्या निसर्ग श्रीमंतीची ओळख होत होती. वाटेत ओहळातून आवाज करीत पाणी वाहत होते. कातळ पहाडातले हे ठिकाण दूरवरून पाहताना कातळात कोरलेले झरोके दुरून खिडक्यांसारखे दिसतात आणि आपली उत्सुकता आणखी ताणली जाते. रस्ता गर्द झाडीतून जातो पण ठिकठिकाणी वाहत्या पाण्यामुळे निसरडे असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सोनावळ्यातून निसर्गाच्या कुशीतून गणपती गडद गाठताना आपण त्या वातावरणात रमून जातो. या डोंगरात कोरलेल्या लेण्या पळूजवळच्या सोनावळे गावातून साधारण दीड तासाच्या चढाईने गाठता येतात.






आपण गणपती गडद या लेण्यांच्या खोदीव पायऱ्यांवर येऊन पोचतो. तेथे क्षणभर बसून सह्याद्रीचे सुंदर रूप आणि नीरव शांतता अनुभवून लेण्यांमध्ये प्रवेश करावा. गणपती गडद हा लेण्यांचा समूह आहे. मुख्य लेण दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे. त्यातील मधल्या लेण्यांमध्ये सुंदर गणेशमूर्ती आहे. या गणेशमूर्तीच्या आजूबाजूला गावकऱ्यांनी बऱ्याच गणेशमूर्ती ठेवल्या आहेत. या गणेशमूर्तींच्या समोर अत्यंत सुंदर कोरीव खांब आहेत आणि त्यांच्यावर विविध यक्षांच्या मूर्तीदेखील कोरलेल्या आहेत. अशा या सुंदर गुहांमध्ये मुक्काम करून सह्याद्रीचे दर्शन घेऊन आकाशनिरीक्षणाचा कार्यक्रम करता येतो.गुहेतला गणपती बाप्पा पाहताना, सभोवतीच्या निसर्गातच जणू बाप्पाचे मनोहारी रूप दडल्याची जाणीव होते आणि या पर्यावरणात असणाऱ्या दैवताला जपण्याची जाणीवही दृढ होते.





 पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.पावसाळ्याच्या या दिवसांत लेण्यांच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे पाण्याची एक चादरच गुहेच्यासमोर पाहायला मिळते.मुख्य लेण्यापासुन खाली १८० फुटाचे रॅपलींग करता येते.हाही एक थरारक अनुभव याठिकाणी घेता येतो.





निसर्गात डोंगरद-यात फिरणा-यांसाठी ही लेणी म्हणजे भटकंतींचे उत्कृष्ट ठिकाणच म्हटले पाहिजे.गणपती गडद लेण्यांना भेट देण्यासाठी दोन ऋतु चांगले आहेत.पाहिला म्हणजे पावसाळा. या ऋतुत या लेण्यासमोर  स्वर्गच अवतरतो.अर्धवर्तळाकार असलेल्या या लेण्यासमुहासमोरुन मोठा धबधबा कोसळत असतो.दुसरा ऋतु म्हणजे उन्हाळ्यातल्या चांदण्या रात्रीचा. नाईट ट्रेकींगला येथे मुक्काम करण्यासारखा आंनद नाही.    






अफाट जंगलात, नाणेघाट, जीवधन, दुर्ग-ढाकोबा, सिद्धगड, गोरखगड किल्ल्याच्या वेढलेल्या खडकात वसलेल्या ह्या लेण्या अप्रतिम कलाकृतीचा नमुना आहे.






एक दिवसात करण्याचा हा एक सुंदर ट्रेक आहे.सह्याद्रीतल्या आडवाटेवर लपलेल्या गणपतीबाप्पाचे शेवटचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागतो.काहीतरी गवसले याचे समाधान मनाला मिळते याचा आंनद होतो.




Thursday, April 18, 2019

चुकामुकीमुळे उडाला गोंधळ




’चुकामुकीमुळे उडाला गोंधळ’ हा लेख ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृतपत्रात दि. १८ एप्रिल रोजी प्रसिध्द झाला आहे.





                               
साता-याहून बामणोली गावच्या दिशेने निघायचे.बामणोली गावात चहापाणी करुन बोटक्लबची परवानगी घेऊन मग वनखात्याची परवानगी घेतली.तसेच वासोटय़ाला नेणाऱ्या बोटीत जाऊन बसलो. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी बोटीची व  आमची तपासणी केली. आमच्याकडे दारू, काडेपेटी नसल्याची खात्री झाल्यावर त्यांनी वासोटय़ाकडे जाण्याची परवानगी दिली. शिवसागर जलाशयातून वासोट्याला जाण्य़ाचा बोटीचा प्रवास सुरु झाला.बोटीच्या प्रवासातच वासोटय़ाचे विलोभनीय दर्शन झाले.

बोटीतून उतरल्यावर किल्ल्यावर चढण्यास सुरुवात केली.दाट जंगल असल्याने सूर्याची किरणे अधूनमधून कधी तरी अंगावर पडत होती. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. खूप फुलपाखरे होती.चालून चालून आम्ही थकलो होतो, पण जंगल काही संपायचे नाव घेत नव्हते. या किल्ल्यावर वनविभागाचे रक्षक कार्यरत आहेत. शेवटी किल्ल्यावर पोहचलो.सह्य़ाद्रीच्या मनमोहक स्वर्गीय सौंदर्याने आमचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. 

आम्ही गडाची तटबंदी पार केली आणि समोरच बिन छपराचे मारुतीरायाचे मंदिर दिसले. पवनसुताची एवढी रेखीव मूर्ती आम्ही कोठेही पाहिली नव्हती.मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणाई वाटा किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. माचीच्या टोकावरून नागेश्वर गुहा दिसत होती.पुढे ही वाटा जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते.बाबुकडा पाहताच आम्हाला आमच्या डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटले.

नागेश्वराला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही.नागेश्वर गुहेच्या दिशेने कुच केली.​वासोटयाहून नागेश्वरला जायचे तर वासोटा पुन्हा अर्धा उतरावा लागतो. वासोटयाकडे जाणार्‍या वाटेलाच एक नागेश्वरकडे जाणारा फाटा फुटतो. इथे दिशादर्शक बाणाचा फलक आहे जो एका घनदाट जंगलातून वाट दाखवतो. इकडून जाताना ठरले की ग्रुपमध्येच रहावे.एकटे पडू नये.ही वाट मात्र वासोटयाच्या वाटेपेक्षा गंभीर वाटली.ह्याच वाटेवरती जनावरे आढळल्याचे ऐकून होतो.नि खरच या जंगलातून जाताना ते जाणवत राहते.इथली वाट वासोटयाच्या तुलनेने छोटी.अधुनमधून दाट रानातून व झाडाझुडूपांतून जाणारी.फारसे 
चढ-उतार नसलेली.पुढे जात असताना आमच्यातल एकजण नसल्याचे आम्हाला निदर्शनात आले.आम्ही धाबरलो.आता याला कोठे शोधायचे असा प्रश्न पडला.त्याच्या नावाने ओरडा सुरु केला.त्याच्याकडून कोणत्याच प्रतिसाद मिळाला नाही.मनात वाईट शंका येऊ लागल्या.काही जणांना मागे पाठविले व काही जणांना दुस-या वाटेने शोधायला लावले.त्याचा शोध लागत नव्हता.आमचा ओरडा ऐकून वनविभागाचे रक्षक आमच्याकडे आले.त्यांनीही शोध मोहीमेत भाग घेतला.दाट जंगलात काळोख असल्याने वनरक्षकांशिवाय इतर जंगलात शिरण्यास भित होते.धावून पळून वनरक्षकही दमले.पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो.विचारविनिमय सुरु होते. इतक्यात एक वनरक्षक त्याला घेऊन तेथे आला.त्याला पाहून आमच्या सगळ्यांचा जीव भांडयात पडला. आम्ही वासोट्याहून नागेशवरला जाण्यास निघालो तेव्हा तो पाण्यासाठी मागे राहील्याने नागेश्वरच्या वाटेकडे न वळता इतर ग्रुपच्या मागोमाग सरळ बामणोलीला जाण्याच्या वाटेने खाली उतरला.काही वेळाने त्याच्या लक्षात आले की आपल्या ग्रुपची व आपली चुकामुक झालेली आहे. तेव्हा तेथे असलेल्या वनरक्षकाची मदत घेतली. त्या वनरक्षकाने त्याला नागेश्वरच्या वाटेने आणून आमच्याकडे सपूर्द केला.आमची चुक आमच्या लक्षात आली.आम्ही त्या सर्व वनरक्षकांचे आभार मानून पुढे निधालो. 

Wednesday, October 10, 2018

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला


                                           आपलं महानगर पूरवणी ( दि. ०९.१०.२०१८ )



Wednesday, February 21, 2018

कुलंग

               कडवे आव्हान देणारा कुलंग गड






















अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा असल्याने व भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.हा गड चढाई साठी कठीण आहे.

आंबेवाडी आणि भगतवाडी मध्ये गाडी ठेवून आम्ही गड चढाईला सुरुवात केली. आंबेवाडी च्या पुढे २ किलोमीटर नंतर ओढ्यावर एक छोटा पूल लागेल तिथेच पायउतार व्हावे आणि डावीकडे मदन गड आणि कुलंग डोळ्या समोर ठेऊन ओढ्याचा काठाने २ कि मी चालत राहावे वाटेत तुम्हाला आदिवासीची छोटीसी वस्ती दिसते.हि घरे ओलांडून पुढे शेतातून जात डावीकडे तुम्हाला एक छोटी टेकडी दिसेल हाच कुलंग चा पायथा जेथून कुलंगची चढाई करावी लागते त्या टेकडीवरून जाणारी वाट म्हणजेच कुलंग आणि मदनगड कडे जाणारी रुळलेली पायवाट. कुलंग च्या पदरात पोहोचायला तुम्हाला एक लांब वळसा घालायला लागतो म्हणजे आपल्याला असे वाटते कि आपण मदन गडा कडे तर नाही न चाललो ?






 दाट जंगलातला टप्पा ओलांडून खडकातील पायऱ्या चढून  मी कुलंग च्या पदरावर दाखल झालो .आता समोर मला कुलंग च्या शिखरावरून खाली उतरणाऱ्या तीव्र डोंगरधारेवर चढायचे होते .पायथ्यापासून ते शिखरा पर्यंत वाट फारच बिकट आहे म्हणजे मोकळी सुटलेली घसरडी माती ,कधी मुरमाड तर कधी दगड धोंडे ,कधी अंगाला घासणारे काटेरी झुडूप आणि वाळलेल्या काठ्या आणि दाट कारवीचे रान यातून वाट काढावी लागली 

पदरातून सरळ त्या डोंगर धारेचा रस्ता पकडावा आणि जवळ जवळ ८० डिग्री ची ती तीव्र चढण काळजीपूर्वक चढणे .या ठिकाणी चुकीला कोणतीही क्षमा नाही त्यामुळे या ठिकाणी लागणारे तीन कातळ टप्पे फारच सावधानीने चढावे.नवख्या लोकांनी इथपर्यंत आलो हेच फार मिळवले असे समजून माघार घेतली तरी चालेल किंवा भीती वाटत नसेल तर पुढे जाण्यास काहीही हरकत नाही .






कुलंग च्या वाटेवर तीन ठिकाणी असे खोल दरीत कोसळणाऱ्या कातळातून वाट आहे त्यामुळे जपूनच चालावे आणि मुख्य म्हणजे "आपण चढतोय पण पुन्हा उतरू शकतो का ? " हा विचार करूनच चढले पाहिजे.कुलंग समोरच असून देखील मात्र अजुनही मान पूर्ण वर केल्याशिवाय दिसत नव्हता. येथून पुढे वाटचाल करत गेल्यावर थोडीशी कठीण अशी कुलंगवर चढणारी धार लागली. सावध पवित्रा घेवून धारे वरुन चढायला सुरुवात केली.या ठिकाणी आपल्याला काळ्या कभिन्न कातळात कोरलेल्या पाय-या लागतात, ज्या की पटकन नजरेत येत नाहीत.छोट्या पाय-या असल्याने चढत असताना अगदीच कड्याच्या काठालगत पाय ठेवून जावे लागत असल्याने खूप मोठी खबरदारी प्रत्येकाला घ्यावी लागत होती. 









  अतिशय अरूंद वाट एका बाजूला कातळ तर दुसरीकडे थेट दरी दिसते. पण सर्वजण तो टप्पा देखील पार करून आता शेवटच्या टप्प्यात आले होते. येथे गडाचा पहिला दरवाजा लागतो येथेच बाजूला अतिशय सुबक आणि स्वच्छ अश्या २ गुहा आपल्या नजरेस पडतात. त्या ठिकाणी जरा विश्रांती घेवून थोड्याश्या अवघड अश्या पाय-या पार करून आम्ही आता अवाढव्य आणि अत्यूच्य अश्या कुलंग गडावर पोहचतो.








ते कातळ टप्पे  पार करून जेव्हा गडात पोहोचतो तेव्हा मात्र जणू आकाशाला स्पर्श केल्याचा आनंद होतो कारण एवढी बिकट वाट आणि त्यानंतर इथे पोहोचणे म्हणजे त्याचा आनंद काही औरच असतो.कुलंग ची वाट हि एकदम खडी आणि  फारच घसरडी आहे.कुलंग गडाची चढाई ही सह्याद्रीतील सर्वाधिक उंचीची खडी चढण समजली जाते. 

नीट निरीक्षण केल्यास कुलंग चा माथा हा गरुडाच्या पसरलेल्या पंखा सारखा भासतो म्हणजे येथे ट्रेक साठी येणाऱ्या मंडळींना जणू गरुडाच्या पंखावरती  स्वर होऊन आकाशात भ्रमण करण्याचा आनंद मिळतो.कुलंगचा दुसर्‍या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे.गडावर कातळकड्यांमध्ये दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहे.किल्लाचे भग्न अवशेष आणि काही गुहा आहेत आणि भरपूर पाण्याचे टाक्या आहेत.  या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटले. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर गेलो.इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन झाले. 







 कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी आल्यानंतर पाण्याचे प्राचीन काळातील नियोजन किती उत्कृष्ट होते याची जाणीव झाली. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. कुलंगवरील एका घळीपाशी आल्यानंतर घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो. या घळीत वरील बाजूने येणार्‍या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसला. या बांधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली आहेत. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्‍यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडण्याची व्यवस्था केलेली आहे. दुर्दैवाने हे गोमुख तुटलेले दिसल्याने माझ्या मनाला खोलवर तडा गेला. कुलंग गडावरून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होत होते. माथ्यावरून दिसणारे संपूर्ण सह्याद्रीच्या मानांकित कळसुबाई रांगेचे सौंदर्य केवळ अप्रतिम! आणखी नजर उंचावल्यावर काहीसे धुसर रामसेज, हरिहर, ब्रम्हगिरी, त्रिंगलववाडी यांची पंगत बसलेली दिसत होती. 









कुलंग हा गड चढण्यास जितका कठीण तेवढाच उतरण्यास कठीण आहे.सावधनतेने उतरावा लागतो.खुप दिवसांपासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न बघता-बघता पूर्ण झाल्याचे एक वेगळचे समाधान मनातून ओसंडून वाहत होते.अतिशय रोमांचिक आणि अविस्मरणीय असा हा ट्रेक होता.ट्रेकरनी कुलंग ट्रेक नक्कीच करावा.

Thursday, November 2, 2017

आड्वाटेवरली ठाणाळे लेणी



                                     ०२.११.२०१७  रोजी ’प्रहार ’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 



                                                  इथे क्लिक करावे  ===>>  आड्वाटेवरली ठाणाळे लेणी






Monday, September 25, 2017

आडवाटेवरल्या ठाणाळे लेणी


                           २५.०९.२०१७ रोजी ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृतपत्रात प्रसिध्द झालेला माझा लेख 



                                                  इथे क्लिक करावे  ===>>    ठाणाळे लेणी




                                                        आडवाटेवरल्या ठाणाळे लेणी 



ह्याद्रीच्या कुशीतली भ्रमंती आपल्याला अनेक अपरिचित गोष्टींचा परिचय करून देते. रानाची ओळख करून घेण्याची संधी मिळते आणि तिथले फळं-फुलं-वन्यजीव असे एक वेगळंच जीवन अनुभवायला मिळते. अशीच आडवाटेवरची डोंगरयात्रा करायचे ठरले.वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत.तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे.काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचेया घाटमार्गावर पावसाळी धबधब्यांचे सौंदर्य मनमुराद पाहायला मिळते.ऐन पावसाळ्यात येथील भटकंतीला रंगत येते ती इथे कोसळणाऱ्या धबधब्यामुळे. 












 अष्टविनायकातील सुप्रसिद्ध गणपती पालीच्या जवळ ऐन सह्यद्रीच्या कुशीत विसावलेले हे ठिकाण.ठाणाळेगावापासून लेणीपर्यंत मात्र पायी जावे लागते.ठाणाळे गाव डोंगराच्या पायथ्याशीच वसलेले आहे.छोटेसे गाव त्यात आम्हाला वाट दाखविण्यासाठी एक वाटाड्या भेटला. गावाच्या मागच्या बाजूने आम्ही चढायला सुरवात केली. घनदाट जंगल, रिम झिम पाऊस सुरु होता.जंगलातली ही पायवाट खूपच निसरडी होती. सुमारे अर्धा तास चालल्यावर आम्हाला वाटेत एक ओहोळ (ओढा) लागला आणि तो ओहोळ पार करून पुढची वाट धरावी लागेत.दोन दिवसाच्या पावसाने ओढ्याला पाणी वाढले होते.मोकळ्या माळरानावर आल्यावर   लांबून लेणींचे दर्शन झाले.चागंलेच जंगल असल्याने परिसर हिरवेगार झालेले होते.वाटाड्या मागदर्शनाखाली चढत उतरत एकमेकांना मदतीचा हात देत लेण्यांच्या दिशेने वाटचाल सुरु होती.पुढे आल्यावर लेणी दिसत नव्हत्या.रानात चकव्या वाट पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम.रमतगमत एक ते दिड तास लेण्यात पोहचण्यास लागतो.पण परिसर खुपच छान आहे.









पायथ्यापासून १००० फुटांवर असलेली ही लेणी पश्चिमाभिमुख आहेत.ठाणाळे लेणी ही २३ बौद्ध लेण्यांचा समूह आहे. निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. लेणीतील चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. दक्षिणोत्तर दिशेत एका माळेत कोरलेल्या बहुतांशी लेण्यांमध्ये बसण्यासाठी अथवा झोपण्यासाठी दगडी ओटे खोदलेले आहेत.कालावैभावाने नटलेल्या सभागृहाच्या छतावरही अज्ञात शिल्पकारांनी कौशल्याने अलंकरण केले आहे.छतात कोरलेले,झुम्बाराचा आभास निर्माण करणार हे शिल्प कातळकलेचा सर्वोत्तम आविष्कार आहे.उत्तरेकडील लेणी फारशी आकर्षक नसून अर्धवट राहिलेली आहेत. 



काही लेण्यांची काळाच्या ओघात पडझड झाली आहे.अलिकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.या लेण्या स्वच्छ होत्या.या लेण्या आडरस्त्याला असल्याने पर्य़टकांची गर्दी नसल्याने लेण्या पाहून मन प्रसन्न झाले.या ठिकाणाहून जाऊच असे वाटत होते.   








लेण्यांना भेट दिल्यानंतर जेवलो व एका धबधब्याखाली मनसोक्त मजा केली. बहुतेक सर्वच लेणी अपूर्ण अवस्थेत आहेत. पण हि जागा खूपच सुंदर आहे.पुढल्या वेळीस लेण्यांमध्ये रहाण्याच्या तयारीनेच येऊ असे म्हणत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.