Thursday, July 28, 2022

चित्त तिचं पिल्लापाशी

मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाचे आंमत्रण दिले. लग्न नागपुरात असून जुन महिन्यात होते. लग्नापूर्वी ताडोबा जंगलात सफारी करण्याची आम्ही मित्रांनी ठरवले. उन्हाचा त्रास होणार आहे. पण या काळात वाघांचे दर्शन होते अशी जाणकारांकडून माहिती मिळाली. लगेच जाण्याचे नक्की करून तिकीटे बुक केली. 


नागपुरात पोहचलो.उन्हाचा कडाका होता.पण धाम येत नव्हता. खाण्याच्या पदार्थात तिखटाचा जाळ होता. आम्ही दहीभातावरच दिवस काढले.पहिल्या दिवशी आम्ही नागपूर पासून ८० किलोमीटर असलेल्या ’उर्मेड’  या अभयारण्यात दुपारी ओपन जीपमधून सफारीला सुरुवात केली. सुकलेल्या व जळलेल्या रानातून जीप जात होती. लांबवर हरणे व नीलगाय दिसले. पक्षी उडताना दिसले.काही झाडांना नवी पालवी फुटलेली दिसली.रानडुकरांचा कळप पाहिला.पण वाघ काही दिसला नाही. उन्हाने हैराण झालो होतो. वाघाच्या नियमित येण्याच्या ठिकाणावर जाऊन आलो.जीप गाड्या इकडून तिकडे घावत होत्या. संघ्याकाळ झाल्यावर जंगलातून हताश होऊन बाहेर आलो.सगळे नाराज झाले होते.


दुस-या दिवशी ताडोबाला निघालो.गेटवर जाऊन नोंदणी करुन दुपारच्या उन्हात जंगलात शिरलो. कॅमेरे जवळ घेतले होते. ’उर्मेड’  पेक्षा ’ताडोबा’ चे जंगल मोठे असून दाट आहे. ’ताडोबा’ मघ्ये कोअर व बफर असे दोन झोन आहेत. दोन्ही झोनची वेगवेगळी फी आहे.  वाघ कोणत्याही झोन दिसू शकतो. गवे,हरणे व रानडुक्कर दिसते होते. मोर व लांडोर दिसले. पाण्याच्या ठिकाणांवर जाऊन थांबलो. वाघाची वाट पाहिली. फक्त पक्षी पाहिले. उन्हाने करपलो होतो. जीपचे चालक व गाईड फोनवरून कोठे तरी वाघ दिसल्याची माहिती घेत होते. संपूर्ण जंगल पालथे घातले. आजपण वाघचे दर्शन होणार नाही असे वाटले.आम्ही नाराज झालो होतो.



इतक्यात गाईडचा फोन वाजला. त्याच्या भाषेत संभाषण झाले. चालकानी गाडी वेगाने वळवली आणि पळवली. वाघ झाडीतून बाहेर आलेल्याची खबर मिळाली होती. जीप चालकाने जीप योग्य ठिकाणी उभी केली. डावीकडच्या झाडीतून वाघ बाहेर पडला आहे,असे गाईडने आम्हाला सांगितले.आमच्या मागे आणखी दोन जीप उभ्या राहिल्या. थोड्याच वेळात  जंगलातून ’घरणी’ नावाची वाघीण आमच्या दिशेत येताना दिसली.आम्ही सर्वजण वाघ दिसला म्हणून खूष झालो.वाघीणीने झाडीतून रस्ता काढत आमच्या जीपच्या समोरून रस्ता ओलांडून उजवीकडच्या झाडीत घुसली. आपल्याच तो-यात चालली होती.तिला कसलेच भय वाटत नव्हते पण आम्हाला गाडीत असूनही भिती वाटत होती. जंगलातील मुक्त वाघीणीच्या दर्शनाने आंनद झाला.


ती वाघीण तिच्या पिल्लाला भेटण्यास निघाली आहे,गाईडने आम्हाला सांगितले व चालकानी गाडी सुरु करून निघाला.वाघीणीचा पिल्लू कोठे आहे चालकाला व गाईडला  माहित असल्याने त्याच दिशेने जीप घावू लागली. चालकाने एका पाणवठ्यावर जीप आणून  बंद केली.ताडबतोब दहा ते पंधरा जीप आमच्या मागे येऊन उभ्या राहिल्या.गाइडने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. आम्ही वाघीणीची वाट पाहत होतो.कॅमेरे तयार ठेवले होते.संध्याकाळ होत होती.



लांबवर झाडीत हालचाल दिसली आणि वाघीणीची चाहूल लागली. वाघीण  झाडीतून बाहेर येऊन उघड्यावर माळरानावर आली होती. वाघीण जंगलाच्या राणीच्या अविर्भावात ऐटीत चालत येताना दिसली. काय तिचा रुबाब होता. चालण्यात एक लकब होती. आपल्या वनक्षेत्राची ‘सम्राज्ञी’ चालत निघाली होती. आम्ही तिची ती चाल पाहत राहोली व तिचे फोटो काढत होतो. लांबून दिसणारी ती वाघीण आता जवळ जवळ येत होती. अर्धी चिखळाने माखलेली होती. उन्हाला जास्त असल्याने गार पाण्यात खूप वेळ बसून बाहेर पडली होती. 



आता ती पाणवठ्याच्या दिशेने निघाली होती. आमच्या समोरून ती पुढे सरकली होती. मध्येच दोन झाडांच्या बुंध्या जवळ रेगांळली व तेथे वास घेऊन पुढे निघाली. आम्ही तिची हालचालीवर नजर ठेवून होतो.पाणवठ्याला वळसा घालताना ती दिसत नव्हती. पाणवठ्याच्या बांधावरून वर आल्यावर पुन्हा दिसू लागली.ती पुढे झाडीच्या दिशेने पुढे जात होती.तीने कसला तरी आवाज केल्यावर त्या झाडीतून तिचा बछडा दुडुदुडु करीत बाहेर आला. दोघेही एकमेकांच्या दिशेने पुढे जात होते.बछडा तिच्याजवळ आला आणि तिच्या पायात गोल फिरू लागला.तिच्या अंगावर उड्या मारू लागला. ती त्याला चाटू लागली. त्या दोघांची ती भेट पाहत राहवीशी वाटत होती.ती भेट पाहून भरून आले.आई व मुलाचे एकमेकावरचे प्रेम तेथे दिसत होते. त्यांना बोलता येत नसले तरीही कृती ते प्रेम व्यक्त करत होते. वाघीणीने बछड्याला खेळ खेळवत व गोंजारत त्याला पाणवठ्याच्या जागेतून बाहेर काढले व दोघे निघाले व झाडीत घुसले. तेथील सर्व प्रकार पाहून आम्ही थक्क झालो. आपण काय पाहिले ते खूपच चांगले पाहिले.     







ही वाघीण चार ते पाच दिवसांनी या बछड्याला भेटली असल्याचे गाईडने आम्हाला माहिती दिली.हा बछडा त्या झाडीतच बसून तिची वाट पाहत होता. या बछड्याच्या भावडांना तेथील वाघाने मारले असल्याने वाघीणीने या बछड्याला वाघापासून लांब सुरक्षित ठिकाणी लपवले होते. तेव्हा ती त्याला भेटायला आली होती. ही गोष्ट कळल्यावर ह्या वाघीणीची व तिच्या बछःड्याची झालेल्या भेटीचे महत्व अधिक वाढले.आम्ही आवाक झालो. त्या बछःड्याशिवाय वाघीणीने एवढे दिवस कसे बाहेर काढले असतील? आणि आई शिवाय बछडा कसा जगला असेल? एकमेकांच्या आठवणीवर हे दोघे कसे जगले असतील का? हे निर्सगातले कोडेच आहे.




पुन्हा जीप चालकांने सर्व जीपच्या गर्दीतून आमची जीप बाहेर काढत वाघाणीच्या मागावर निघाले. एका ठिकाणी जाऊन थांबले.पण यावेळी आमच्या पुढे काही जीप उभ्या राहिल्या होत्या. त्यांना अंदाज होता वाघीण व तिचा बछडा या रस्त्याने येतील.अंधार पडत चालला होता.आम्ही त्या दोघांची वाट पाहत होतो.थोड्यात वेळात ती दोघं आम्हाला लांबून येताना दिसली.बछडा वाघीणीच्या पायात सारखा येत होता. त्या दोघांनी आमच्या समोरुन रस्त्या ओलांडला. जीप गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. बछडा तिच्या पासून थोडा मागे रेंगाळला. दोघांमध्ये थोडे अंतर पडले होते.ती तिच्यात तो-यात चालत होती.एक जीप तिच्या पुढे गेल्यावर तीने त्या जीपवर एक कटाक्ष टाकला.वाघीणीच्या एका नजरेने सर्व धाबरले होते.ती तेथेच थबकली.मागे पाहिले.तिला तिचा बछडा लांबवर दिसला.वाघीणीने त्याच्याकडे पाहिल्या बरोबर बछडा पळतपळत वाघीणी जवळ आला. त्याला पुढे झाडीत घुसवून वाघीण नंतर झाडीत घुसली. आता ती नजरेआड झाली होती. सर्व शांत झाले. 




वाघीणीचा वीस ते पंचवीस मिनिटांचा तो प्रवास आम्ही जवळून पाहिला. वाघ दिसला नाही म्ह्णून नाराज झालेले आम्ही भारावून गेलो.त्या दोघांची ती भेट आम्ही कधीच विसरू शकणार नाही.आताही ती दोघं नजरेसमोर दिसत आहे. आई व तिच्या मुलाचं नातं निव्वळ वात्सल्याचं असतं. 

   





Wednesday, July 6, 2022

आम्ही ट्रेकर्स!

'आम्ही ट्रेकर्स!’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रातील ’कट्टा आमचा हक्काचा’ या सदरात दि. ०६ जुलै २०२२ रोजी प्रसिध्द झाला आहे. 






मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबचा ट्रेकिंग या साहसी खेळाचा एक ग्रुप आहे. गेली तीस वर्षात या ट्रेकिंग ग्रुपने  सह्याद्री व हिमालयात मोहिमा आखून यशस्वी केल्या आहेत. प्रत्येक ट्रेकला मोठ्या संख्येने ट्रेकर सहभागी होतात. लहान मुलं, महिला व सेवानिवृत कर्मचारी देखील ट्रेकमध्ये कायम सामील होतात. सर्वांना निसर्गात नेऊन इतिहासाची ओळख करीत सुरक्षित ट्रेक करणे हा ग्रुपचा मुख्य हेतू असतो.तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टचा १५० वा वर्धापन दिन....२६ जून १८७३ रोजी असल्याने विश्वविख्यात संस्थेचा स्थापना दिवस. खास या दिनाचे औचित्य साधून मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब ने आयोजित केलेला ही मोहिम पूर्ण करुन हा स्थापना दिन साजरा केला.

गेल्या दोन ते अडीच वर्षात करोनामुळे एकाही ट्रेकमध्ये कोणालाच सहभागी होता आले नव्हते. या वर्षी पावसाळा सुरु झाल्याबरोबर सर्वांनी ट्रेकला जाण्याची तयारी सुरु केली. यंदा सर्व मित्रांना भेटण्याची संधी गमवायची नव्हती. सर्व मित्रमंडळींना ब-यास दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटण्याची आस लागली होती. शहापूर जवळील "आजोबा" पर्वतावरील "सितामाईचा पाळणा ट्रेक" करण्याचा बेत आखला गेला. ट्रेक मोठा न ठेवता सर्वांना एकत्र भेटता यावे म्ह्णून हा ट्रेक ठरवला. सोशल मिडियाच्या मदतीने सर्व ट्रेकर्स माहिती देण्यात आली. कधी एकदा सह्याद्रीत जाऊन मित्रांना भेटतो असे झाले होते.उत्साह खूप वाढला होता.

कसारा लोकलमध्ये सर्व ट्रेकर्स ठरलेल्या डब्यात चढत होते. एकामेकांना मिठ्या मारत होते. ते पाहून आंनद झाला. सर्वांनी मित्रांसाठी आपल्या सॅक भरून खाऊ आणला होता. आसनगाव - शहापूर आणि पुढे जीपने प्रवास करीत वाल्मीकी आश्रमात पोहचलो. सर्वांनी एकमेकांची खुशाली घेतली व नव्याने  सामील  झालेल्यांची ओळख करून घेतली. विविध वयोगटातील जेष्ठ व नव्याने सामील झालेल्या सुमारे पन्नास ट्रेकर्संनी या ट्रेकला हजेरी लावली. 

आश्रमाचा जवळचा परिसर रम्य आहे. या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचे मंदिर, कालभैरव , शंकर मंदिर आणि काही वीरगळ व समाधी शिळा पाहिल्या. या आश्रमा मागून धबधब्याच्या वाटेने चढण्यास सुरुवात केली. घनदाट  जंगल असल्याने वर चढताना उन्हाचा त्रास झाला नाही. पाऊस नसल्याने खूपच गरम झाले. तासा दिड तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. येथे डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी १५ फ़ूटाचा छोटा रॉक पॅच आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवल्याने गुहेपर्यत पोहचणे सुरक्षित झाले आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर खडकात कोरलेल्या लवकुशाच्या पादुका दिसतात. तेथेच लव कुशांचा पाळणा लावलेला आहे. आजची रात्र येथेच गुन्हेत राहावे असे सर्व ट्रेकर्स वाटत होते.

थोड्यावेळाने खिंड धुक्यात गेली. जोरात गार वारे वाहू लागल्याने चढतान आलेला थकवा दूर झाला.फोटोग्राफी झाली गाणी झाली. तथेच पोटपुजा करून खाली उतरू लागलो. उतरताना पावसाचा अभिषेक सुरु झाल्याने भिजण्याचा आंनद घेता आला. मोठा पाऊस झाला नसल्याने खाली वाटेत असलेल्या धबधब्याला पाणी नव्हते. ट्रेकचा थकवा दूर करता न आल्याने त्या आंनदापासून दूरावलो.    

ह्या ट्रेकचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटल्याने हा ट्रेक सर्वांच्या आठवणीत राहील. पुढच्या ट्रेकची आखणी करत घरचा प्रवास सुरु केला. 

Thursday, February 3, 2022

निसर्ग संपन्न तांबलडेग

 





                 निसर्गसंपन्न तांबळडेग 


मित्राने, त्याच्या गावाला ’विठ्ठल रखुमाई’ चा सप्ताह असल्याने येतोस काय? अशी विचारणा केली. मी कोकणात जाण्यास कधीच नाही म्हणत नसल्याने लगेच तयारी करुन निघालो. कोकणातील ’देवगड’ जवळील ’मिठबांव’ गावाच्या बाजुला असलेल्या  ’तांबळडेग’ या गावी पोहचलो.तांबळडेग गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. तांबलडेगच्या पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला खाडी असल्याने समुद्र व खाडीच्या मिलापाने  सुंदर सौंदर्य प्राप्त झाले आहे. तांबळडेग हे देवगड तालुक्यातील समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गावात प्रवेश करावा लागतो. गावात जागोजागी आमराई व नारळाच्या बागातून लपलेली कौलारु घरं दिसत होती.घराला लागून असलेल्या वाडीत कामे करणारी माणसं दिसत होती.


सिंधुदुर्गातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तांबळडेग किनाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. तांबळडेग या गावाला  प्रशस्त आणि स्वच्छ असा सुमारे ४ कि.मी. लाबींचा समुद्र किनारा लाभलेला आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन सोनेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मिती केली असावी. तांबळडेग चा समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर असल्याने आपण त्याच्या प्रेमात पडतो.


समुद्र किनारी जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. निरनिराळ्या असंख्य पक्षांचा विहार सुरु असतो. समुद्रात मच्छिमारी नौका लांबवर दिसतात.अशा सुंदर समुद्रकिनारी समुद्राच्या लाटा अंगावर घेण्याचा आंनद लुटता येतो.या किना-यावरील शांतता, रमणीयता आणि भव्यता मोहीत करणारी आहे. जलविहार आणि जलक्रीडा करण्यासाठी हा समुद्र किनारा सुरक्षित समजला जातो. या किना-यावर समुद्र गरूड, सी-गल असे पक्षी तर डॉल्फीन सारखे मासे पहायला मिळतात.गावात मासेमारी करुन आणलेली मासळी देवगड बाजारात जाते.तेव्हा गावाच्या पुर्वेला असलेल्या खाडीचा मासेमारी करीता चांगला उपयोग होतो. 


समुद्र किना-याला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता ’गजबा’ देवीचे मंदिर आहे या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. माता गजबादेवी मंदिरापासून समुद्र किना-याचे आणि या परिसराचे दृश्य अप्रतिम आणि मोहक दिसते. मंत्रमुगध करणारा हा परिसर प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी नसते.


देवगड तालुक्यातील समुद्रकासवाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तांबळडेग. तांबळडेगचा किनारा ऑलिव्ह रिडलेची या प्रजातीच्या कासवांसाठी उपयुक्त आहे.ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांना जीवदान देण्यात येथील ग्रामस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करुन शेकडो कासवे येथून समुद्रात सोडतात.


तांबळडेग नगरीत सात दिवस विठू माऊली प्रगट झाल्याचे चित्र पहायला मिळाले.संपूर्ण गाव भक्तीमय झालेला असतो.मुंबईहून

बरीच मंडळी या सप्ताहाला आवर्जून येतात. नेत्रदीपक श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती, कलाकुसर असलेले मंदिर, आकर्षक विद्युत रोषणाई, भजन असा सोहळा पहायला मिळतो. रात्री दिंडीच्या कार्यक्रमाला गावातील सर्व मंडळी जमतात.


तांबळडेग समुद्रकिनारी चांदण्या रात्री फिरण्यास वेगळाच आंनद मिळतो. समुद्राची गाज ऐकत थंड हवेचा गारवा झेलत वाळूच्या किनारी फिरण्याचा अनुभव आंनद देतो. वेगवेगळी ताजी मच्छी खाण्याचा आंनद घेता येतो.  


देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर बीच, आदी प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. तांबळडेग गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना याची फारशी माहिती नाही. परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा या गावी आवर्जून येतात. तांबळडेग म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदातरी येथे निश्चित भेट द्यावी.






Friday, December 31, 2021

निसर्गाचे विलोभनीय दर्शन

 





मायावी सौंदर्याची दुर्मिळ अनुभूती 


बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहेत. या बेटांना आगळ्या- वेगळ्या संस्कृतीचे आणि अनोख्या निसर्गसंपदेचे वलय लाभले आहे. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे,निळेशार पाणी, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण आहे.नीरव शांतता आणि शांत समुद्र जिथे एकत्रितपणे अनुभवण्यास मिळते ते ठिकाण म्हणजे अंदमान.सूर्यकिरणांत चमचमणारा, काही ठिकाणी निळसर हिरवा, तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र आणि सोनेरी वाळूच्या आधाराने विसावलेले हिरव्या जंगलांचे असंख्य तुकडे! हे अंदमानचं विलोभनीय दर्शन! अंदमान नुसतंच सुंदर नाही तर वेड लावणारं आहे.तसेच अंदमान म्हटलं की, आपल्याला आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा. भारताने जपून ठेवलेलं एक सुंदर गुपित! आपण राहतो त्या जगापासून दूर, कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग!


अंदमानच्या पोर्ट ब्लेअर,नील,हॅवलॉक व रॉस या बेटावरील रमणीय समुद्रकिनारे पाहून झाल्यावर आम्ही  ’बारातांग’ च्या दिशेने निघालो. अगदी मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्रातून जातानाचा आनंद हा अगदी अवर्णनीय मनाला आल्हाद देणारा होता. एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जहाजांनी गेल्यानंतर जिपने पुढचा प्रवास सुरू झाला रस्त्यांनी जाताना ’जारवा’ आदिवासी दिसले ते बरेचदा आपल्या गाडीजवळ येऊन आपल्या जवळचे कॅमेरे, खाण्याच्या वस्तू हिसकतात म्हणून तिथे गाडी न थांबवता जोरात नेली जाते. आदिवासी लोकांना छायाचित्रण, संवाद किंवा खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. ’जारवा’ आदिवासी राखीव क्षेत्राच्या मर्यादित क्षेत्रातून जाण्य़ासाठी काही ठराविक वेळा आहेत ज्या दरम्यान काफिल्याच्या सुरवातीला आणि शेवटी पोलिसांसह वाहनांना काफिल्यात जंगलात सोडले जाते. जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. गुहे जवळचा थोडासा प्रवास खारफुटीच्या गर्दीतून आहे. किर्र झाडीतून एका छोट्याश्या लाकडी पुलावर उतरता येते. तिथून साधारण एक ते सव्वा किलोमीटर चालत गेल्यावर चुनखडीच्या गुहा दिसतात. या गुहा म्हणजे खरोखरी एक नैसर्गिक अविष्कारच म्हणावा लागेल.परत येताना मड आयलड पाहिले. येथे जिवंत ज्वालामुखी पाहता आला.


पोर्ट ब्लेअर परत न जाता आम्ही दिगलीपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. या प्रवासामध्ये एकदा जहाजातून गाडी टाकून दुस-या बेटावर गेलो. लांबचा प्रवास असल्याने दिगलीपूर येथे पोहचण्यास रात्र झाली. दिगलीपूर हे उत्तर अंदमान बेटावरचे छोटे शहर आहे. दुस-या दिवशी दिगलीपूरच्या ’एरियल बे’ जेट्टीवरून बोटीने ’रॉस आणि स्मिथ’ नावाच्या शांत जुळ्या बेटांवर जाण्यास निघालो. अथांग  निळ्याशार समुद्रातून छोट्या फायबर मोटरबोटीने ६ ते १० जणांना प्रवास करावा लागतो. ही दोन्ही बेट दिग्लिपूरपासून ८ किमी अंतरावर आहेत.तेथे पोहोचण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा प्रवास आहे. हा २५ मिनिटांचा बोटीचा प्रवास सुखद अनुभव आहे. या बोटीच्या प्रवासाला वनविभागाचा परवाना आवश्यक आहे.


उत्तर अंदमान मधली स्मिथची भव्य जुळी सुंदर बेटे आहेत. कोणाच्या फारशा परिचयाची नसलेली आणि घनदाट झाडींनी वेढलेली ही दोन बेटे!! पन्नास मीटर-लांब वाळूच्या पट्टीने जोडलेली आहेत. ही रेशमी पांढरी वाळूची पट्टी समुद्राच्या आत उंच भरतीच्या वेळी खाली येते आणि कमी भरतीच्या वेळी पुन्हा वर येते. समुद्रकिनाऱ्यावर कमी भरतीच्या वेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालता येते. एक आश्चर्य पाहण्यास मिळते. एक किनारा निळाशार तर दुस-या किना-याला हिरवी झाक दिसते. येथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. ही अप्रतिम व्हर्जिन किनारे पाहताना आपण चित्र असल्याचा भास होतो.


अंदमान बेटांमधील एक लपलेले नंदनवन जेथे पर्यटकांचा एक नगण्य भाग आहे. त्यांना सुंदर म्हणणे हे कमी लेखणे आहे. या बेटांना भेट देणे म्हणजे 'जगाबाहेरचा' अनुभव आहे. बेटांच्या जोडीमध्ये अप्रतिम विस्तीर्ण व्हर्जिन समुद्रकिनारे आहेत, एका बाजूला उथळ पोहण्याचे क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम डाईव्ह आणि स्नॉर्कलिंग साइट्स आहेत. दोन्ही किनारे सोयीयुक्त असून स्वच्छ ठेवण्यात आले आहेत. दोन्ही बेटांच्या किना-यांवर पोहण्याचा आंनद लुटता आला.


अंदमानमधल्या या जुळ्या बेटांवरून पाय निघत नाहीत पण या सुंदर बेटांवर राहण्याची परवानगी नसल्याने ’दिगलीपूर’ परतावे लागते. या बेटांवर जायाचे असल्यास अंदमान सहलीत तीन दिवस व बराच खर्च वाढतो. यासाठी पर्यटक या बेटांवर जात नाहीत. पण या जुळ्या बेटांना भेट न दिल्यास ’अंदमान सफर’ पूर्ण होणार नाही.





Sunday, October 17, 2021

नयनरम्य परिसर....केदारनाथ

 



केदारनाथ...पवित्रता व सुंदरता  

चारधाम यात्रेत आम्ही ’गंगोत्री’ ला ’गंगा’ देवीचे दर्शन घेऊन केदारनाथ या महत्वाच्या तीर्थक्षेत्राकडे निघालो. प्रवास कधी उंच पर्वतांच्या कड्याहून तर कधी पायथ्याच्या नदीच्या बाजुने सुरु असतो. सोनप्रयाग पर्यत ४०० किमीचा व नऊ तासाचा प्रवास होणार होता. चार धाम यात्रा ही अत्यंत सुलभ परंतु सर्वात कठीण प्रवासांपैकी एक आहे. हिमालयातील रस्त्यांवर शारीरिक आणि मानसिक त्रास अनुभवण्यासाठी तयारी असली पाहिजे.

सोनप्रयाग हे केदारनाथ घामकडे जाणारे धार्मिक महत्व असलेले ठिकाण आहे. तेथे आम्ही रात्री मुक्कामासाठी पोहचलो.सकाळी लवकर उठून गौरीकुंड च्या दिशेने निघालो. गौरीकुंड हे केदारनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राच्या १६ किलोमीटरच्या पायी प्रवासाचा सुरुवातीचे ठिकाण आहे.गौरीकुंडमध्ये देवी पार्वती देवीला समर्पित मंदिर आहे, गौरी देवी मंदिर. ही ती जागा आहे जिथे पार्वती देवीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी ध्यान केले होते.

पत्नी बरोबर असल्याने ट्रेक न करता दोन घोड्यांवर दोघांनी बसून गौरीकुंडापासून सकाळी लवकरच प्रवास सुरु केला. मी पहिल्यांदाच घोड्यावर बसलो होतो. फार विचित्र व वाईट वाटत होते. पायी चालणारे यात्रेकरू व समोरुन येणारे घोडे यातून मार्गक्रमण करीत चढाई सुरु होती. एकाबाजूने खोल दरी व दुस-या बाजुला पर्वताचा कडा अशा अरुंद वाटेवरून प्रवास सुरु असतो. वाट चांगली बांधून घेतलेली आहे.दरीच्या बाजुला रेलींग आहे.घोड्यांची घाण उचलायला साफसपाई करणारे कर्मचारी असतात.कोसळणारे धबधबे व हिरवाई असे सुंदर निसर्ग पाहत पाहत प्रवास सुरु होता. काही अंतरानंतर पठारावर आलो. ग्लेशियरच्या बाजुने जाताना थंडावा जाणवत होता. चढ उतारातून वाटचाल सुरु होती. मंदिर कधी दिसते याची उत्सुकता वाढली होती. घोडे थांबले,तेथे आम्ही घोड्यावरून उतरलो. घोड्याचे आभार मानून मंदिराच्या दिशेने पायी निघालो. मंदिर दिसताच नतमस्तक झालो. केदारनाथांचे दर्शनाने समाधान मिळाले व प्रसन्न वाटले. मंदिराच्या बाजुचा निसर्ग म्हणजे स्वर्ग आहे. देव व निसर्ग या दोन्ही गोष्टीमुळे एकाच ठिकाणी असल्याने  तेथून पाय निघत नाहीत. केदारनाथ येथील सुंदरता अवर्णनीय आहे.        


केदारनाथ मंदिर हे एक प्राचीन भव्य शिव मंदिर असून रुद्र हिमालय पर्वतरांगेत वसलेले आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. हिंदू धर्मात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.अतिशय निसर्गरम्यपणे ठिकाण आहे.त्याच्या सभोवताल उंच, बर्फाच्छादित पर्वत आहेत ते उन्हाळ्यात हिरव्या कुरणात व्यापतात. मंदिराच्या पाठीमागे उंच केदारडोम शिखर आहे. केदारनाथ मंदिर परिसरात दरवर्षी हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते.त्यावेळी मंदिर बंद असते.  


भगवान केदारनाथ मंदिर उंच बर्फाळ पर्वतांच्या कुशीत वसलेले आहे.पहाटे या बर्फाळ पर्वतांवर सुर्याची पहिली किरण पडतात.त्यावेळी पर्वतांची शिखरं सोनेरी रंगानी उजळून निघतात. तेव्हा भगवान केदारनाथानी सोनेरी मुकुट परिधान केलेला दिसतो. दिवसभर पर्वतांवर सुर्यकिरण पडतात तेव्हा शिखरं चांदीसारखी चमकतात. भगवान केदारनाथ पहाटे सोनेरी व नंतर दिवसभर चांदीचा मुकुट परिधान करुन असतात. संपूर्ण केदारनाथ धामचे वातावरण भक्तिमय असते.     

हे मंदिर वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे. केदारनाथ मंदिराची कारागिरी तितकीच पाहण्यासारखी आहे. हे मंदिर सहा फूट उंच चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे. हे मंदिर असलार शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये दगड स्लॅब किंवा सिमेंटशिवाय एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिराच्या बाहेर  पाहरेक-याच्या  रूपात नंदीची स्थापना केलेली आहे.

२०१३ मध्ये झालेल्या महाभीषण प्रलयालामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि रस्त्याचे नुकसान झाले. त्यामुळे मंदिराच्या परिसरात खुप बदल झाला आहे. मंदिरामागे मोठी शिळा येऊन थांबली आहे, असे म्हणतात की या ’भिमशिळे’ मुळे मंदिराचे नुकसान झाले नाही.

या ठिकाणी वातावरण कधीही बदलत असते परंतु त्यातल्या त्यात एप्रिल, मे महिन्यापासून वातावरण खुप चांगले असते ते नोव्हेंबर पर्यंत. म्हणुनच यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधाम मंदिराची दरवाजे हिंदू पंचांगनुसार अक्षय तृतीया या दिवशी उघडतात आणि दिवाळी पासून बंद होतात.

भारतातील सर्वात पवित्र व प्रसिद्ध मंदिरापैकी एक केदारनाथ  मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही दरवर्षी लाखो श्रद्धाळू केदारनाथ चरणी लीन होण्यासाठी या मंदिराला भेट देतात. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिराला जीवनात एकदा तरी भेट द्यावी.



Wednesday, September 15, 2021

स्वप्नवत वाटणारी सफर

 



         दि.१६ सप्टेंबर २०२१... महाराष्ट्र टाईम्स ..पुरवणी



स्वप्न सफर...नुब्रा व्हॅली 


लेहमधली प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन दुस-या दिवशी नुब्रा व्हॅलीच्या दिशेने निघालो. रस्त्यात ’खारदुंगला पास’ पार करावा लागतो. लेहलडाखची सहल उत्सुकता, उत्साह व भीती या संमिश्र भावनांनी सुरु होते. वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता.जसे जसे वर जात जातो तसा हवेतला ऑक्सिजन कमी झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत राहतो. खारदुंगला टॉपला पोचलो तेथे अधिक वेळ न दवडता पटकन दोन फोटो काढून आम्ही पलीकडल्या बाजूस उतरायला सुरुवात केली. नुब्रा आणि श्योक खोर्‍यांना लेहशी जोडणारा हा संपूर्ण रस्ता जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनकडे जाणारा असल्याने कायम कडेकोट बंदोबस्तात असतो. लष्कराचे अस्तित्त्व पावलोपावली जाणवते. तेवढीच मेहनत रस्ता कायम सुरू ठेवणासाठी घेतली जाते. वळणावळणाचे रस्ते असले तरी खड्डे नसलेली डांबरी सडक होती. डावीकडे उत्तुंग पर्वत आणि उजवीकडे अतिशय भयावह खोल, पाताळाचाही ठाव लागणार नाही अशा घळी.त्यांच्या मधून जाणारा अतिशय अरुंद रस्ता.गाडीत जीव मुठीत धरुन बसावे लागते.


देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमांचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे पण खार्दुंगला पासच्या खाली असलेल्या छावण्यांमध्ये सजग असणार्‍या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुन आपल्याला थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खुजे आहोत ह्याचीही जाणीव होते.


श्योकनदीच्या काठाकाठाने पुढे सरकत होतो तसा श्योक आणि नुब्रा खोर्‍यांचा अद्भुत सौंदर्याचा अजोड ठेवा आमच्यासमोर उलगडत होता.नुब्रा नदी या व्हॅलीतून वाहत असल्यामुळे या व्हॅलीला नुब्रा व्हॅली म्हणतात. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता आणि त्याची सोनेरी आभा आसपासच्या पर्वातांवर उमटली होती. सर्व शिखर सोनेरी दिसत होती. पायथ्याशी रुप्याचं पाणी घेऊन वाहणारी श्योक नदी. नदीकाठावर चिमुकली गावं आणि काही ठिकाणी आर्मीची क्वार्टर्स. या खोर्‍यात उतरल्याबरोबर काहीतरी वेगळ्यात विश्वात आल्याचा भास होत होता. सगळाच सोन्याचा चमचमाट, नदीत रुप्याच लखलखाट. दूरवर धुंद झालेले पर्वत संध्याकाळ जवळ आल्याची नांदी.


डिस्कीट येथे नुब्रा आणि श्योक नद्यांचा संगम होतो. दोन वेगवेगळ्या खोर्‍यांतून आलेल्या नद्या आपापले अस्तित्व विसरुन एकमेकांत लीन होतात. पुढचा पूर्ण रस्ता श्योक नदीच्या काठाने होता. श्योक नदीचे अवाढव्य पात्र बघून असे वाटत होते कि हिला खरोखर शोकांतिका लागली आहे. एवढे मोठे पात्र असून पण नदी पूर्ण कोरडीच आहे. तो नजारा रस्त्यातून पाहत पाहत पुढे हुंडरचा प्रवास सुरु ठेवला.  

 

हुंडर हे गाव (cold desert) थंड वाळवंट, तसेच अतिशय सुंदर (sand dunes) वाळूच्या देवता या साठी प्रसिद्ध. पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव. बाजूला शेती.झुळझुळ वाहणारी नदी. उंच उंचीच्या थंड वाळवंटांनी वेढलेले एक आश्चर्यकारक निसर्ग,  वाळूचे ढिगारे व नयनरम्य पर्वत - थोडक्यात, ही नुब्रा व्हॅली आहे. नुब्रा व्हॅलीच्या अद्वितीय हुंडर प्रदेशाच्या सौंदर्याबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी, ही एक जादुई भूमी आहे जी शब्दात पकडली जाऊ शकत नाही! विस्तीर्ण वाळूच्या पात्रात प्रवाहाने रांगोळय़ा रेखत जाणारी शायोक नदी, वाळवंटातील वाळूवाळूच्या टेकडय़ा, तिच्यामध्येच हिरवळ, रंगीबेरंगी बोडके डोंगर आणि माथ्यावर बर्फाचा मुकुट! सृष्टीतील सर्व वैविध्यं तिथं एकवटलेलं. हुंडरमध्ये वाळूचे ढिगारे आणि श्योक नदीचा विस्तृत विस्तार आहे. सुमारे दहा हजार फूट उंचीवर वसलेले, हंडर बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे. नेत्रदीपक परिसराला नयनरम्य पार्श्वभूमी प्रदान करते. नदीच्या किनारी पसरलेलं वाळवंट आणि त्यामागोमाग उत्तुंग पर्वतरांगा व त्यावरील बर्फाच्छादित शिखर अशा निसर्गातील परस्परविरोधी गोष्टी एकाच जागी दिसण्याचा चमत्कार केवळ नुब्रा व्हॅलीतील हुंडर या ठिकाणी अनुभवता येतो. नुब्रा व्हॅलीचं वैशि‍ष्ट्य म्हणजे पाठीवर दोन उंचवटे असणारे उंट इथे बघायला मिळतात. प्राचीन व्यापार मार्गाने प्रवास करणारे व्यापारी हे उंट माल वाहण्यासाठी वापरत असत. या उंटावर बसून वाळवंटात बसून सफर करता येते. वाळवंटातील ही सफर म्ह्णजे एक वेगळाच अनुभव आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय आहे. सतत बदलत राहणारे लँडस्केप हि लडाख ची विशेषता.


नुब्रा व्हॅलीतील या रस्त्यावर डिस्कीट ही जगप्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे. ही लडाख मधील सर्वात जुनी आणि मोठी मॉनेस्ट्री समजली जाते. चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणाहुन दुर दुर पर्यन्त मानवी वसाहतीची कुठलीही खूण दिसत नाही.  मॉनेस्ट्री च्या बिल्डिंग वर १०६ फूट उंचीचा श्योक नदी कडे तोंड करून मुकुट घातलेला जाम्पा (मैत्रेय) बुद्धाचा बसलेला पुतळा आहे.  मॉनेस्ट्री च्या अंगणातून श्योक नदीचा सुंदर देखावा दिसत होता.


मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्‍याचं काळं करणारं रणरणतं ऊन निसर्गाची वेगवेगळी म्हणजे अप्रतिमपासून अक्राळविक्राळ रौद्र रुपं बघून आपण स्तिमित होतोच पण निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालणार नाही हे प्रकर्षाने जाणवतं. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणार्‍या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. हेच ते लडाखी स्वप्न. लेहलडाख हा हिमालयातील प्रदेश पाहण्याचं स्वप्न साकार झाले. 


लेह-लडाखला फक्त एकदाच जाऊन मन तृप्त होत नाही. निसर्गाने निर्मलेल्या या अनोख्या विश्वाची प्रत्यक्ष भेट घेण हाच खरा आयुष्यभरासाठी अविस्मरणीय अनुभव असेल!

Thursday, August 26, 2021

ट्रेकर्ससाठी एक पर्वणी

 






                                      ‘कलावंतीण’ दुर्ग   


 नावाप्रमाणे प्रबळ आणि भव्य गडाच्या बाजुला दिमाखात उभा असलेला ‘कलावंतीण’ चा बुरुज. अतिशय सुंदर भौगोलिक परिसर आणि कलात्मक पायऱ्या ह्यामुळे “कलावंतीण दुर्ग” ट्रेकर्स मध्ये प्रिय आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे.

पुणे-मुंबई हमरस्त्यावरून  दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची  जाणीव करून देणारा बुरुज. कलावंतीणसुळका हे प्रबळगडा शेजारील एक सौंदर्यस्थळ आहे. पनवेल मधून १५ किमी अंतरावर माथेरान डोंगर रांगेत ’प्रबळगड’ व ’कलावंतीण’ बुरुज वसलेले आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर पनवेल हून ७-८ किमी गेलो कि ’शेडुंग’ फाटा लागतो. या फाट्यावरून डावीकडे वळण घेतले कि त्याच रस्त्याने पुढे यावे.छोट्याशा प्रवासानंतर लोणीवली वाडीला जाणारा डावीकडे अन ठाकूर वाडीकडे जाणारा उजवीकडील मार्ग लागेल. 

माचीच्या पायथ्याशी ’गणपती’ व ’हनुमान’ यांचे उघडे मंदिर लागते. दर्शन घेऊन पुढे आलो कि एक पठार (प्रबळमाची) लागते.’शेडुंग’  मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते.गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते.’कलावंतीण’ बुरुज हा खालून पहिले असता छोटासा सुळका वाटतो पण जस जसे आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला त्याच्या भयानकेतेची महती कळते. 

पायवाटेने प्रबळवाडीची वस्ती मागे सोडून आलो कि उजवीकडील वाट ’प्रबळगडा’ साठी तर  डावीकडील वाट ’कलावंतीण’ साठी जाते. डावीकडील वाट पकडावी.घनदाट जंगलातून वाट काढत आपण प्रबळ व कलावंतीण यांच्यामधील घळीमध्ये जाऊन पोहोचतो.डोंगरात खोदलेल्या सरळ असलेल्या पायऱ्या हे ’कलावंतीण’ चे मुख्य वैशिष्ट्य व आर्काषण आहे. इथून कलावंतीण चा सुळका, कातळात खोदलेल्या पायऱ्या फारच आकर्षित करत असतात. या पायऱ्या इतक्या कौशल्याने खोदल्या आहेत कि चढणाऱ्या आणि उतरणा-याला अजिबात दृष्टीभय वाटत नाही. त्याबाबतीत त्या अज्ञात शिल्पकाराला शतश: प्रणाम !!

प्रबळगडाकडे पाठ करून आपण डोंगरकपाऱ्यांच्या आधाराने काही उंचीवर खोदलेल्या पायऱ्या गाठतो. या पायऱ्या दगडात व्यवस्थित कोरल्या आहेत. एका बाजूला खोल दरी असल्यामुळे इथून जाताना जरा सावकाश चढाई करावी लागते.डोंगरात खोदलेल्या एक फुट ते दीड फुट उंचीच्या पायऱ्या चढताना आपल्याला इतिहास काळात जाणे न झाले तरच नवल म्हणावे. ही चढण धोकादायक नाही परंतु एक अत्यंत रोमांचकारक असे वाटते. माथ्यावर पोहोचल्यावर पाहतो तर काय अजून एक सरळसोट खडक आमच्या व कलावंतीण च्या सर्वोच्च टोकावर  जाण्याच्या मध्ये उभा असतो.शेवटी सुळक्याचा माथा गाठण्यास परिश्रम करावे लागतात. 


कठीण वर्गात गणल्या जाणा-या कलावंतीण बुरुजावर आपण चढाई केल्याचा आनंद देखील मनात राहतो.पाठीमागे वळून पाहता प्रबळगडचा विस्तार दिसतो तसेच त्याच्या प्रबळतेची प्रचीती आल्याविना राहत नाही. माथ्यावर पोहचलो कि याला चहुबाजूंनी नजर फिरवावी तेव्हा कलावंतीण हा एक पहारेकरी  होता याची खात्री पटते. कारण, याच्या माथ्यावरून उजवीकडे अग्नेयला माथेरानचे पठार दिसते,  तर ईशाळगड प्रबळच्या मागे लपलेला( जो प्रबळ गडाहून दिसतो), पुर्वेला चंदेरी, विकटगड तर ईशान्येला कल्याणची खाडी, हाजी मलंग यांचे दर्शन घडते. एकाच दिवसात कलावंतीण आणि प्रबळगड एका अविस्मरणीय अनुभवासहित पाहून होतो.



कलावंतीण बुरुज हा “वन डे ट्रेक”चा उत्तम पर्याय असला तरीपण येथे नवख्याने ट्रेकींगसाठी शक्यतो जाऊ नये किंवा गेलातच तर अनुभवी ग्रुप व मार्गदर्शक सोबत असावेत. पावसाळ्यात पाय-यांवर चिखल व शेवाल असल्याने हा ट्रेक जास्त धोकादायक आहे,याचे ट्रेकरनी नोंद घ्यावी”कलावंतीण दुर्ग’चा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात.’कलावंतीण दुर्ग’चे गिर्यारोहण एक पर्वणी आहे